भारतात कसोटी सामना खेळण्याचे स्वप्न पाहतोय ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू
श्रीलंकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियन संघही ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. ज्यासाठी संघाची घोषणा होणे बाकी आहे. मात्र या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अॅश्टन अगर भारताविरुद्ध खेळण्याचे स्वप्न पाहू लागला आहे. त्याने १० वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केले होते आणि गेल्या ५ वर्षांपासून तो क्रिकेटच्या या फॉरमॅटपासून दूर आहे. या मालिकेत त्याला संधी मिळेल की नाही हे सांगणे कठीण आहे.
सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत अॅश्टन अगर म्हणाला,
“मला भारतात खेळले जाणारे कसोटी सामने बघायला खूप आवडत असे. आणि मी सुरुवातीपासूनच भारतात कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहत होतो. भारतात टीव्हीवर कसोटी सामने पाहणे खूप रोमांचक आहे. तिथे फिरकीपटूंना खूप मदत आहे. मला या दौऱ्यावर नक्कीच जायला आवडेल पण पुढे काय होते ते पाहू.”
१० वर्षात ४ कसोटी आणि ९ विकेट
डावखुरा फिरकीपटू अगरने आपल्या १० वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ४ सामने खेळले असून ९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने शेवटचा कसोटी सामना २०१७ मध्ये खेळला होता. त्याने आतापर्यंत ६३ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत ज्यात त्याची गोलंदाजीची सरासरी ४१.८४ आहे. त्याने २२७१ धावा केल्या आहेत ज्यात तीन शतकांचाही समावेश आहे. हेही वाचा – टीम इंडिया २०२३ मध्ये खेळणार ५० हून अधिक सामने, सर्वाधिक सामने ‘या’ देशाविरुद्ध
पदार्पणाच्या कसोटीत ११ व्या क्रमांकावर ९८ धावा केल्या होत्या
या २९ वर्षीय खेळाडूने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ११व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ९८ धावांची शानदार खेळी खेळली होती. संधी मिळाल्यास सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल, असं तो म्हणाला होता.