T20 World Cup: भारताची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून केला पराभव


शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या ICC अंडर-१९ महिला टी-२०  विश्वचषक २०२३ च्या पहिल्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव करून स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५ गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या. भारतीय संघाने १६.२ षटकांत ३ गडी गमावून ही धावसंख्या गाठली. श्वेता सेहरावतने नाबाद ९२ आणि कर्णधार शेफाली वर्माने ४५ धावा केल्या.

बेनोनी येथे खेळल्या गेलेल्या या ग्रुप डी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघाने ५ बाद १६६ धावा केल्या. संघाकडून सायमन लॉरेन्सने ४४ चेंडूंत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. मॅडिसन लँडेसमनने ३२, एलांद्री व्हॅन रेन्सबर्गने २३, कॅराबो मॅसिओने नाबाद १९ आणि मियां स्मितने नाबाद १६ धावांचे योगदान दिले. भारताकडून शेफाली वर्माला सर्वाधिक २ आणि सोनम यादव आणि पार्श्वी चोप्राला प्रत्येकी १ यश मिळाले.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्वेता सेहरावत आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी करून भारताला दमदार सुरुवात करून दिली. श्वेता सेहरावतने ५७ चेंडूंत २० चौकारांच्या मदतीने नाबाद ९२ धावांची खेळी केली. भारतासाठी ५१ टी-२०, दोन कसोटी आणि २१ एकदिवसीय सामने खेळलेली शेफाली या सामन्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसली. शेफाली वर्माने ४५ धावांची खेळी केली.

शेफालीने आपल्या खेळीत ९ चौकार आणि १ षटकार लगावला. ती आठव्या षटकात फिरकी गोलंदाज मिया स्मितच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्याचवेळी जी त्रिशाने १५ आणि सौम्या तिवारीने १० धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेसाठी शेषनी नायडू, मियां स्मित आणि मॅडिसन लँडेसमन यांनी प्रत्येकी १ यश मिळविले.

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा