अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाची सावंतवाडीमध्ये कारवाई


सावंतवाडी : जिल्ह्यातील सावंतवाडी येथून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड येथे गुटखा पानमसाला वितरीत होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई स्थित मुख्यालयातील दक्षता विभागास प्राप्त झाली होती. या माहितीच्या अनुषंगाने कारवाई घेण्यासाठी मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापुर येथील अधिकाऱ्यांनी सावंतवाडी येथे दि. ६ मार्च रोजी अचानक धाड टाकली. चंद्रशेखर पांडूरंग नाईक यांच्या मालकीच्या प्लॉट क्र.ई. २८७, न्यू खासकिलवाडा, नवसरणी रोड, सावंतवाडी येथील गोडावूनमध्ये विमल पानमसाला व व्ही वन तंबाखूचा साठा आढळून आला तर गोडावून बाहेर असलेल्या पिकअप क्र. MH07 AJ2436 मध्ये ही पानमसाला सुगंधीत तंबाखूचा साठा होता.

सर्व साठ्याची किंमत रु. ४५,१३,६०० एवढी आहे. तसेच चंद्रशेखर नाईक यांचा मुलगा गजानन उर्फ गौरव नाईक यांच्या गौरव एजन्सी, प्लॉट क्र. ई.२२१, कोठावळे पाबंद, खासकीलवाडा, सावंतवाडी येथे टाकलेल्या छाप्यात नजर गुटखा, विमल पानमसाला, आरएमडी गुटखा, सुगंधीत तंबाखू इ. चा ५८,०६,९४३/- चा साठा जप्त करण्यात आला. पिक अप व्हॅन, जप्त करण्यात आली असून गोडवून व एजन्सी सीलबंद करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण रु.१,०३,२०,५४३/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलिस स्टेशन येथे सुंदर कुबन, गजानन उर्फ गौरव नाईक, चंद्रशेखर नाईक, राहुल मटकर,सचिन व्यवहारे, वामन हलारी यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा ३२८ व भारतीय दंड संहिता कलम ३२८, १८८, २७२, २७३ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, सह आयुक्त ( दक्षता ) डॉ.राहुल खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) गुप्तवार्ता उल्हास इंगवले यांच्या नियंत्रणात अरविद खडके, सहायक आयुक्त (अन्न), ठाणे, निलेश विशे,अन्न सुरक्षा अधिकारी ( गुप्तवार्ता ) मुंबई, इम्रान हवालदार,अन्न सुरक्षा अधिकारी सातारा, राहुल ताकाटे अन्न सुरक्षा अधिकारी ठाणे, मंगेश लवटे अन्न सुरक्षा अधिकारी कोल्हापूर, महेश मासाळ, अन्न सुरक्षा अधिकारी कोल्हापूर यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

अन्न व औषध प्रशासन संदर्भात तक्रारी अथवा गोपनीय माहिती असल्यास प्रशासनास टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे यांनी केले आहे.