सूर बदलला, केएल राहुलला संघातून बाहेर काढा म्हणणारे आता करत आहेत केएल राहुलचं कौतुक


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना संपला आहे. या सामन्यात टीम इंडियाने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा फलंदाजी करताना फक्त188 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २० षटकांपूर्वीच आपले ३ विकेट गमावले होते. मात्र केएल राहुलच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला. यासोबतच राहुलने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांचीही मुस्कटदाबी केली आहे.

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी ही मालिका सुरू होण्यापूर्वी केएल राहुलला संघातून बाहेर काढण्याचा आग्रह धरला होता. राहुलला संघातून बाहेर काढण्यासाठी व्यंकटेश यांनी सोशल मीडियावर मोठा आवाज उठवला होता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने नाबाद ७५ धावांची शानदार खेळी करताच त्यांचाही सूर पूर्णपणे बदलला. व्यंकटेश यांनी ट्विट केले की, “दबावाखाली उत्कृष्ट संयम आणि केएल राहुलची शानदार खेळी. रवींद्र जडेजाची चमकदार साथ आणि भारताचा चांगला विजय.”

व्यंकटेश प्रसाद व्यतिरिक्त वसीम जाफर आणि आकाश चोप्रा यांनीही रवींद्र जडेजा आणि केएल राहुलच्या शानदार खेळीचे कौतुक केले आहे. जाफरने लिहिले की “दबावाखाली या दोघांनी उत्कृष्ट खेळ आणि संयम दाखवला. तल्लख. त्याचवेळी आकाश चोप्राने केएल राहुलचे नाव न घेता त्याचे जोरदार कौतुक केले.”

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ १८८ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य ३९.५ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यात केएल राहुलने शानदार अर्धशतक झळकावले.

तर पहिल्या डावात मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत आणि एकापाठोपाठ तीन ऑस्ट्रेलियन विकेट्स घेतल्या. भारतासाठी वेगवना गोलंदाज सिराजने 3 आणि रवींद्र जडेजाने 2 बळी घेतले, कर्णधार हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श वगळता एकाही फलंदाजाला आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मार्शने 65 चेंडूत 81 धावा केल्या.