उदय सामंतांच्या भावाने व्हॉट्सअप डीपीला ठेवली मशाल, कोकणात राजकारण तापण्याची चिन्हे


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष फुटली आहे. एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी एक असलेले उदय सामंत उद्योग मंत्री आहेत. उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी आपला व्हॉट्सअप डीपी मशाल ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे. किरण सामंत यांनी फक्त आपला व्हॉट्सअप डीपीच बदलला नाही तर ‘जो होगा वो देखा जायेगा’ असा स्टेटस ठेवला आहे. यामुळे किरण सामंत ठाकरे गटात जाणार का…? अशा चर्चा रंगू लागल्या आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण उर्फ भैया सामंत यांचे नाव शिवसेनेकडून घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी या मतदारसंघात भाजपच निवडणूक लढवेल, असे ठणकावून सांगितले होते.किरण सामंत यांना हवे असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा वरिष्ठ विचार करतील, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर लवकरच ‘करारा जबाब मीलेगा’, अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.