लडाखच्या त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन कोटी रुपये
मुंबई : लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने तीन कोटी रुपयांचा धनादेश आज कारगिल विजय दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लेफ्टनंट जनरल एच. एस. कहलोन यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार श्रीकांत भारतीय आदी उपस्थित होते. विधिमंडळातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात हा कार्यक्रम झाला.
२४ व्या कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, देशाचे रक्षण करताना शहीद जवानांबद्दल आदर आणि कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनाला युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीमध्ये सहभागी होता आले हे राज्यासाठी अभिमानास्पद आहे. या युद्ध स्मारकाच्या माध्यमातून सामान्यांना प्रेरणा मिळेल, असे सांगतानाच राज्यातील भारतीय सेनेतील जवान आणि माजी सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी राज्य शासनाने वेळोवेळी हिताचे निर्णय घेतले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र शूरविरांची भूमी असून देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांविषयी नेहमीच आदर असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि भारतीय सेनेने या स्मृतीस्थळासाठी राज्याला सहभागाची संधी दिली त्याबद्दल आभार मानले.
त्रिशूल युद्ध स्मारकाच्या विकासासाठी मदत करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे लेफ्टनंट जनरल श्री. कहलोन यांनी यावेळी सांगितले. युद्धस्मारक कशाप्रकारे असणार आहे याविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. आमदार श्री. भारतीय यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सैनिक कल्याण विभागाचे संचालक राजेश गायकवाड, ब्रिगेडियर अचलेश शंकर, लेफ्टनंट कर्नल एस. के. सिंग, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजल जाधव आदी यावेळी उपस्थित होते.