IND vs NZ: शुभमन गिलचं वादळ! द्विशतक झळकावत रचला इतिहास


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना (IND vs NZ 1st ODI) हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करत वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. ही खेळी खेळण्यासोबतच शुभमन गिलने सहकारी खेळाडू इशान किशनचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत (IND vs BAN) सलामीवीर इशान किशनने केवळ 131 चेंडूत 210 धावांची शानदार खेळी केली. ही झंझावाती खेळी खेळण्यासोबतच तो भारतासाठी द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. पण, शुभमन गिलने त्याचा विक्रम मोडला आणि हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

शुभमन गिलने केवळ 23 वर्षे 132 दिवसांच्या वयात एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. तर इशान किशनने वयाच्या 24 वर्षे 145 दिवसांत हा पराक्रम केला.

वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ 1st ODI), शुभमन गिलने 139.6 च्या स्ट्राइक रेटने फक्त 149 चेंडूत 208 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 19 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकार दिसले. गिलच्या या झंझावाती खेळीमुळे भारतीय संघाला 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावांची मोठी मजल मारता आली.

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा