सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी पवार सरसावले, रेल्वेमंत्र्यांशी करणार चर्चा! अर्चना घारे-परबही दिल्लीला जाणार


सावंतवाडी : रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या प्रश्नात लक्ष घालू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. याबाबत ते २६ जून रोजी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा म्हणून मला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्याची माहिती अर्चना घारे-परब यांनी दिली.

सावंतवाडी शहरातून जाणाऱ्या नियोजित बांदा-संकेश्वर महामार्गाकडे पवारांचे लक्ष वेधले जाईल, असे अर्चना घारे-परब म्हणाल्या. सावंतवाडी – मळगाव येथे रेल्वे टर्मिनस मंजूर झाले मात्र त्याचे काम अर्धवट राहिले. मात्र त्यानंतर कामाला गती मिळाली नाही. यातील बहुतांश काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे टर्मिनसला मंजुरी मिळूनही सावंतवाडीला कोणताही फायदा होत नाही.

वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यावेळी सावंतवाडीत वंदे भारतला स्टॉप देण्याची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर घारे-परब यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत पक्षाध्यक्ष पवार यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केला.

त्यावेळी हा प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे. यासंदर्भात २६ जून रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. खासदार विनायक राऊत यांनाही यासाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही दोघे तसेच पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे अर्चना घारे-परब यांनी सांगितले.