रवींद्र महाजनी यांची ‘एक्झिट’ वेदनादायी : सुधीर मुनगंटीवार


मुंबई : ‘झुंज’ या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपट सृष्टीतून कारकीर्द सुरू करणारे  चतुरस्त्र अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट व कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांची  एक्झिट अतिशय वेदनादायी आहे, अशी शोकभावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

रवींद्र महाजनी हे त्यांच्या देखण्या आणि भारदस्त व्यक्तीमत्वामुळे 1980 च्या दशकात ‘चॉकलेट हिरो’ म्हणून प्रसिद्ध होते. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, दुनिया करी सलाम अशा चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. त्यांची देऊळबंद चित्रपटातील संत श्री गजानन महाराज यांची भूमिका छोटी पण लक्षात राहणारी आहे.

रवींद्र महाजनी यांच्या निधनाने त्यांचा चाहता वर्ग, मराठी चित्रपट सृष्टी आणि त्यांचा परिवार सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी या गुणवान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. ( Ravindra Mahajani’s exit is painful Sudhir Mungantiwar )