पी. एम. किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली केली जाणार!


सिंधुदुर्ग : पी. एम. किसान योजने अंतर्गत अपात्र लाभार्थी यांची वसुली करण्याकामी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी अपात्र ठरण्याकामी खालील निकष विचारात घेतले जातात. खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत.

सर्व संस्थात्मक जमीनधारक, अशी शेतकरी कुटूंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत. संवैधानिक पद धारण करणारे, केलेले आजी व माजी व्यक्ती. आजी, माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी, मा. जी खासदार, राज्यसभा सदस्य, आजी, माजी विधानसभा, विधान परिषद सदस्य, आजी, माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत संस्थांचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी, कर्मचारी (चतुर्थश्रेणी, गट ड वर्ग कर्मचारी वगळून) सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रु. 10,000/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (चतुर्थश्रेणी, गट ड वर्ग कर्मचारी वगळून) मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती. नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती. वरील कारणास्तव अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची वसुली करणे आवश्यक असून मा. आयुक्त कृषि तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख पी. एम. किसान, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून मिळालेल्या सूचनेच्या अनुषंगानेच जिल्हा प्रशासनाने आपल्या यंत्रणांना सदर योजनेअंतर्गत ‘अपात्र’ ठरलेल्या लाभार्थ्यांची वसुली करण्याबाबत सूचित केले आहे.

त्याचप्रमाणे मयत लाभार्थ्याच्या ‘मयत दिनांकानंतर त्याच्या बँक खात्यात सदर योजनेच्या हफ्त्याची रक्कम जमा झाली असेल तर ती वसुली करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करणेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जे लाभार्थी उपरोक्त नमुद निकषात बसत नसतील त्यांना या योजनेचा लाभ सुरू राहणार असून त्यांची वसुली करण्यात येणार नाही. याची नोंद घेण्यात यावी.