गोवा विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मोदी मंत्रिमंडळाने दिली मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोव्यातील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. गोवा सरकारच्या मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण मनोहर पर्रीकर यांच्या नावावर करण्यास मान्यता दिली होती. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा हा निर्णय गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राला कळवला, त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानेही त्याला मंजुरी दिली आहे. मोपा, गोवा येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आले.

अधिकृत निवेदनानुसार, गोवा राज्यातील जनतेच्या मागणीनुसार, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोपा गोवा येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव मनोहर आंतरराष्ट्रीय असे ठेवण्याच्या निर्णय घेतला. पर्रीकर यांना श्रद्धांजली म्हणून गोव्यातील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ – मोपा, गोवा’ असे नामकरण करण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे.

निवेदनानुसार, गोवा सरकारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री दिवंगत डॉ. मनोहर पर्रीकर यांनी आधुनिक गोव्याच्या उभारणीत दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ विमानतळाचे नाव देण्यात आले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे १७ मार्च २०१९ रोजी निधन झाले. पर्रीकर दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. पर्रीकर यांच्या मागे दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा उत्पल हे राजकारणात सक्रिय असतात तर लहान मुलगा अभिजीत हा व्यवसाय करतो.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा