कोकणातील मिरग म्हणजे काय? माहिती आहे का?


हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणा-या 27 नक्षत्रांपैकी 9 नक्षत्रं ही पावसाची असतात. ‘नक्षत्रं आणि दरवर्षी त्यांची बदलणारी वाहनं’ ही अत्यंत मजेशीर आणि तितकीच संशोधनात्मक बाब आहे. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी ‘रोहिणी’ नक्षत्रापासून होत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा ‘मृग’ नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. मृगशीर्ष नक्षत्राशी सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो. शेतकरी या वेळेला ‘मृग लागले’ असे म्हणतात.

रोहिणी नक्षत्र गेल्यानंतर ज्येष्ठ (साधारणत: जून) महिन्यात मृग नक्षत्राची सुरुवात होते. याला आपण कोकणी भाषेत ‘मिरग’ असे म्हणतो. पाऊसाची सुरुवात या नक्षत्रा पासून होते म्हणून पाऊस आगमन सोहळ्यासारखे साजरे केले जाते. आजही कोकणातील प्रत्येक घरात या पावसाच्या आगमनाचे पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा दिसून येईल.

७ जून हा मिरगाचा Kokanatil Mirag दिवस मानला जातो. पण काही गावांत तो मृगनक्षत्रातील १५ दिवसातील पहिल्या ते शेवटच्या दिवसा पर्यंत कोणत्याही एका दिवशी साजरा केला जातो. मृग नक्षत्र सुरु झाले कि, निसर्गातील होणारे बदल हे शेतकऱ्याला शेतीची कामे सुरु करण्याची चाहूलच देत असतो. निसर्गात होणारे बदलाची सुरवात हि, जमिनीतून येणारा लाल रंगाचा ‘मिरग’ किटकापासून होते. कोकणातील लाल मातीत हा ‘मिरग’ दिसू लागला कि, मृग नक्षत्र सुरु झाल्याची पहिली चाहूल असते. मिरग सुरु झाला कि, ‘इथल्या शेतकऱ्याला आता पेरणीची वेळ सुरु झाली.’ हि निसर्गा कडून बातमी मिळते. आणि शेतकरी लगेचच शेतीच्या कामाला सरुवात करतो.

या दिवसांत झाडांवर काजव्यांची लक-लक दिसायला सुरवात होते. अंगणात आणि घरात हि रात्रीचे काजव्यांची ‘चमचम होते. रात्री अंगणातील चटईवर झोपून मोकळ्या आभाळातील चमचमत्या चांदण्या आणि समोरील झाडावरील लुकलुकणारे काजवे हे एक सारखेच दिसून येतात. तेव्हा निसर्गाची दिवाळी बघण्याचा विलक्षण अनुभव मिळतो. जणू निसर्ग स्वतःच पाऊस सुरु होण्याचे स्वागत या निसर्ग निर्मित लाईटिंगने करत असतो. लहान मुलं तर काचेची किंवा प्लॅस्टिकची बरणी घेऊन काजवे पकडतात. अलीकडील दोन तीन वर्षांत पर्यटकांसाठी काही शहरांजवळील गावांत ‘काजवा महोत्सव किंवा Fireflies Festival’ साजरा केला जातो. पण मला या महोत्सवातून अंगणात जो आनंद मिळतो तो मिळत नाही.

पहिला पाऊस सुरु झाला कि, कोकणातील लोकं चढणीचे मासे पकडणे (प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारे मासे) आणि खेकडे किंवा लाल चामटे (लाल छोटा खेकडा) पकडणे सुरु करतात. ( तांब्या आणि टोप म्हणजे एखादे पाणी भरण्याचे छोटेसे भांडे – खेकड्याच्या टोकदारपणा मुळे पिशवी फाटते म्हणून खेकडे पकडायला भांडे वापरतात) मिरगात कोकणातील प्रत्येक घरात रात्री चुलीवर या थोडेसे तिखट-मीठ टाकून भाजलेले मासे किंवा कालवण आणि खेकड्यांचा काढा हमखास पाहायला मिळेल.

मृग नक्षत्रात इथला शेतकरी या वर्षातील पहिल्या पावसाचे आगमन आणि शेत जमीन यांचे पारंपारिक पद्धतीने पूजन करतात. त्यालाच कोकणात ‘मिरगाची राखण’ असे म्हणतात. या पावसाची आणि धरणी मातेची कृपा इथल्या शेतकऱ्यावर राहावी हे साकडे या मिरगाच्या राखणेतून घातले जाते. या राखणचे दोन प्रकार इकडे बघायला मिळतील. एक ‘तिखटी’ आणि ‘गोडी’. तिखटी राखण म्हणजे कोकणातील प्रत्येक घरात मिरगाची राखणेसाठी ‘मिरगाचा कोंबडा’ निसर्गाला अर्पित केला जातो. तर ‘गोडी राखण’ म्हणजे एक भेंडा (भाजीतील भेंडी) घेऊन त्याचा देठ कापून धरणी मातेला अर्पण केले जाते. या दोन्हीतील एका प्रकारे राखण दिली जाते. कोणत्याही प्रकारे राखण दिली तरी त्यात ‘नारळ’ हा कायम असतोच. राखणेची सुरवात धरणी मातेच्या रक्षणकर्त्याला म्हणजे राखणदाराला जाप म्हणजेच गाऱ्हाणे घालण्या पासून करतात.

‘बा देवा मेरेकरा/ महाराजा माज्या शेताच्या रकवालदारा .. दर वर्सा सारखो आज ह्यो तुका नारळ कोंबो ठेवलेलो हा तो मान्य करून घे गुराढोरांचा मुला बाळांचा शेताचा रक्षण कर… आनी तुजो मिरग यंदा मजेत करून घी रे म्हाराजा..! तुझी कृपा दृष्टी कायम असू दे रे माहारजा… व्हय महाराजा..!’ या गाऱ्हाण्यातून ‘शेत जमिंचे रक्षण करणार्याला नारळ आणि कोंबडा अर्पित करत आहोत म्हणून आमच्या शेताचे आणि कुटुंबियांचे रक्षण कर’ हे साकडे घातले जाते. त्यानंतर तोच कोंबडा चुली वर शिजवतात आणि सर्व एकत्र मिळून चवीने खातात. राखणे देण्यासाठी वाडीतील इतर नातेवाईकांना हि आवर्जून आमंत्रित केले जाते. मिरगाची राखण देऊन झाल्या नंतर शेतकरी जोमाने शेतात कामाला सुरुवात करतो.

मृग नक्षत्र सुरु झाले कि, कोकणातील प्रत्येक घरासमोरील नेहमी शेणामातीने सारविलेले अंगण हि लाल मातीने रंगून जाते. मातीचा सुंगध दरवळायला सुरवात होते. त्याच अंगणात घरात जपून ठेवलेल्या तोवशी (दोडकी), पडवळ, भोपळा, काकडीच्या, वांगी, मिरची, मखमलीची (लाल झेंडूची) बिया लावायला सुरवात होते. त्या सोबतच लाईट जाण्याची पण सुरुवात होते. जो पर्यंत नियमित पाऊस पडायला सुरुवात होत नाही तो पर्यंत इथे प्रत्येकाला मृग नक्षत्रात ‘लाईट जाणे’ हे नित्यनियमाचे असते असे वाटते. समुद्राचा रंग बदलायला सुरुवात होते. मच्छीमार समुद्रात लांब मासेमारीसाठी जाणे बंद करतात. मिरग सुरु होण्या आधी घराची कौल (नळे /छप्पर) पण दुरुस्त केली जाते. इरली साफ केली जातात. घराच्या भोवती नारळाच्या झावळीने किंवा इतर सुक्या झाडांच्या सहाय्याने ‘सपार’ (एक आवरण) बनवले जाते कारण मातीच्या भिंती भिजू नये.