जाणून घ्या शिरशिंगे येथील मनोहर-मनसंतोष या ऐतिहासिक गडाचा इतिहास
सावंतवाडी – कोकणात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अप्रतिम असे गड-किल्ले पाहायला मिळतात. असाच एक गड आहे तो म्हणजे सावंतवाडीच्या शिरशिंगे गावातील मनोहर-मनसंतोष गड. या गडाचं सर्वात महत्वाचे वैशिष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी या गडावर ३४ दिवस मुक्काम केला होता.
निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या शिरशिंगे गावात पाऊल टाकल्यावर नजरेत पडणारा हा गड. नद्या, हिरवीगार वनराही, डोंगरातून वाहणारा पांढरा शुभ्र धबदबा अश्या सुंदर वातावरणात उंचावर वसलेला हा गड आजही आपल्याला इतिहासाची ओळख करून देतो. या गडावर आपल्याला पुरातन काळातील अवशेष पाहायला मिळतात. हा गड चढण्यासाठीदेखील सोपा आहे. शिरशिंगे गावातील मळईवाडी, गोटवेवाडी आणि शिवापुर या गावांच्या अगदी जवळ असलेला हा गड आहे.
गोठवेवाडी आणि शिवापुर यांच्या रस्त्यावरून काही अंतरावर आपल्याला पहिले प्रवेशद्वार मिळते. या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला बांधीव पायऱ्या मिळतात. पुढे गेल्यावर आपल्याला वाटेच्या उजव्या बाजूला कातळकडा पाहायला मिळेल, तर त्याच्या डाव्या बाजूला खोल दरी आहे. थोडं वर गेल्यावर आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करतो. गडावर गेल्यावर आपल्याला शिरशिंगे आणि शिवापुर गावाचा डोळे भरून टाकणारा सुंदर असा निसर्ग पाहायला मिळतो.
गडाच्या माथ्यावर गेल्यावर आपल्याला लांब पसरलेली तटबंदी आणि पडके अवशेष पाहायला मिळतात. तसेच आपल्याला येथे एक विहीरदेखील पाहायला मिळते, वैशिष्ट म्हणजे एवढ्या उंच गडावर असलेल्या या विहिरीला बारामाही पाणी असतं. तसेचं विहीरीच्या पुढे तटबंधीत दोन शौचालये आहेत. पुढे गेल्यावर आपल्याला एका औदुंबराच्या झाडाच्या खाली मूर्त्या पाहायला मिळतात. गडावर असलेल्या झेंड्याला वळसा घालून गेल्यावर आपण मनोहर गडाच्या टोकाला पोहोचतो तेथे आपल्याला दोन्ही गडातील दरी नजरेत पडते. मनोहर गड मनसंतोष गडापेक्षा उंच असल्यामुळे तेथे असलेल्या वास्तूंचे अवशेष आपल्याला सहजपणे पाहायला मिळतात.
मनोहर मनसंतोष गडाचा इतिहास
हा गड कोणी बांधला याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही मात्र, बांधणीची रचना ही शिवाजी महाराजांनी केली असावी. या गडावर शिवाजी महाराजांनी १३ मे १६६७ ते १५ जून १६६७ असे ३४ दिवस मुक्काम केला असल्याची सांगण्यात येत आहे. नंतरच्या काळात या गडाचा ताबा कोल्हापूरच्या छत्रपतींकडे गेला. पुढे गडकऱ्यांनी गडावर बंड केले. हे बंड मोडण्यासाठी छत्रपतींनी पुढे आपल्या सरदारांना पाठविले. मात्र पुढील काळात वारंवार बंड होत राहिल्यामुळे शेवटी छत्रपती शहाजी महाराज या गडावर दाखल झाले. पुढे त्यांनी गडकऱ्याला अटक केली आणि मनोहर गडावर असलेल्या २ तोफा त्यांनी नेल्या अशी नोंद आहे.
पुढे १८४४ मध्ये इंग्रजांच्या विरोधात झालेल्या बंडात मनोहर गडाने इंग्रजांना जेरीस आणले. या बंडातील महत्वाचा सूत्रधार म्हणजे फोंड सावंत तांबूळकर हे होते. पुढे त्यांनी सावंतवाडी संस्थानाचे युवराज अनासाहेब यांना सावंतवाडीच्या राजवडयातून मनोहर गडावर आणले आणि त्यांच्या नावाने आजूबाजूच्या परिसरात वसूली करण्यास सुरवात केली. पुढे गडाच्या परिसरात दारुगोळा बनवण्यास सुरवात केली. इथून तयार झालेला दारुगोळा पुढे रांगणा गड, सामानगड येथे पाठवण्यात येत असे. या सर्व घटनेनंतर या बंडाचा बीमोड करण्यासाठी इंग्रजांनी पुढे गोळ्यांचा मारा केला यावेळी मनोहर-मनसंतोष गडाच्या पायऱ्या उध्वस्त झाल्या होत्या.