कटकमध्ये मकर संक्रांतीच्या मेळ्यात चेंगराचेंगरी, १ ठार, ९ जखमी


ओडिसा : मकर संक्रांतीच्या मेळाव्यात कटक येथील टी-ब्रिजवर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर लहान मुले आणि महिलांसह एकूण ९ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक गर्दीत चेंगराचेंगरी झाली. लोक आवाज करत एकमेकांच्या अंगावर धावू लागले. काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मकर संक्रांतीनिमित्त टी ब्रिजवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तीन किलोमीटरहून अधिक लांबीच्या या पुलावर दोन लाख लोक उपस्थित होते. अचानक काही मुद्द्यावरून गर्दीत चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गर्दी मोठी होती. सुरुवातीला लोकांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर चेंगराचेंगरी झाली. जीव वाचवून लोक धावू लागले.

काही काळ परिस्थिती अनियंत्रित झाली होती. लोक इकडे तिकडे धावताना दिसत होते. जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. चेंगराचेंगरीच्या वेळी काही लोकांनी घाबरून पुलावरून उड्याही मारल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या प्रशासन बचावकार्यात गुंतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथागढचे एसडीएम हेमंत कुमार स्वैन यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी सुमारे २ लाख लोक मेळ्यात सहभागी होण्यासाठी जमले होते. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. जत्रेसह भगवान सिंहनाथाची पूजा करण्यासाठी येथे लोक जमले होते. ज्यात चेंगराचेंगरी झाली.

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा