भारताचा न्यूझीलंडला ३-० असा क्लीन स्वीप, टीम इंडिया वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी


शुभमन गिल आणि रोहित शर्माच्या शतकी खेळीनंतर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव करत एकदिवसीय मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते, न्यूझीलंडचा संघ २९५ धावांवर गडगडला. शार्दुल ठाकूरला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला. या विजयासह टीम इंडिया वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. टी-२० क्रमवारीत टीम इंडिया आधीच अव्वल आहे.

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये २१२ धावांची भागीदारी झाली. रोहित शर्माने तीन वर्षांनंतर वनडेत शतक झळकावले. त्याच्या कारकिर्दीतील हे 30 वे शतक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३० शतके झळकावणारा तो जगातील तिसरा फलंदाज आहे. रोहित शर्मा ८५ चेंडूत १०१ धावांची (०९ चौकार, ०६ षटकार) खेळी करून बाद झाला. शुभमन गिलनेही कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले आणि ७८ चेंडूत (१३ चौकार, ५ षटकार) ११२ धावा करून बाद झाला. विराट कोहलीने २७ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. इशान किशन (१७ धावा) धावबाद झाला, तर सूर्य कुमार यादव १४ आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावा करत बाद झाला. हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी शेवटच्या षटकात वेगवान धावा केल्या. शार्दुल ठाकूरने १७ चेंडूत २५ धावांची खेळी केली, तर हार्दिक पांड्याने ३८ चेंडूत ५४ धावांची (३ चौकार, ३ षटकार) खेळी केली. भारताने ५० षटकांत ९ गडी गमावून ३८५ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने पहिल्याच षटकात फिन ऍलनची (० धावा) विकेट गमावली. हार्दिक पांड्याने त्याची विकेट घेतली. यानंतर डेव्हन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांनी १०६ धावांची भक्कम भागीदारी केली. कुलदीप यादवने ही भागीदारी तोडली. निकलसने ४२ धावांची खेळी केली. निकलस बाद झाल्यानंतर डॅरेल मिशेलने डेव्हॉन कॉनवेला साथ दिली आणि ७८ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंड संघाने २५ षटकांत २ बाद १८४ धावा केल्या होत्या, मात्र 26व्या षटकात शार्दुल ठाकूरने एका षटकात दोन गडी बाद करत सामना उलटवला. मिचेलने २४ धावांची खेळी खेळली. टॉम लॅथमला खातेही उघडता आले नाही. शार्दुल ठाकूरने त्याच्या पुढच्याच षटकात ग्लेन फिलिप्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवून न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले.

डेव्हॉन कॉनवेने एका टोकापासून आघाडी कायम ठेवली आणि वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. डेव्हॉन कॉनवे १०० चेंडूत १३८ धावा करून उमरान मलिकचा बळी ठरला आणि त्यानंतर न्यूझीलंडचा पराभव निश्चित झाला. न्यूझीलंडचा संघ ४१.२ षटकात २९५ धावांवर गारद झाला. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलने २ विकेट्स घेतल्या.  उमरान मलिक आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी १ विकेट मिळाली.

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा