Ind vs Aus: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी चांगली बातमी, अय्यरचं होणार पुनरागमन


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू झाली आहे. रोहित शर्मा अँड कंपनीने मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघ चांगलाच दमदार दिसत होता. पण टीम इंडियाचा सामनाविजेता खेळाडू श्रेयस अय्यर पहिल्या कसोटी सामन्याचा भाग होऊ शकला नाही. दुखापतीमुळे त्याला या सामन्यापासून दूर ठेवण्यात आले होते. मात्र आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी श्रेयस अय्यर फिट झाला असून तो पुनरागमन करणार हे नक्कि झालं आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 9 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. पहिला सामना नागपुरात झाला, जो यजमानांनी अवघ्या तीन दिवसांत जिंकला. भारतीय संघातील खेळाडूंनी स्फोटक फलंदाजी करून सामना जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले असले तरी मधल्या फळीत संघाला फलंदाज श्रेयस अय्यरची खूप उणीव भासली. दुखापतीमुळे अय्यर या सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला या सामन्यापासून दूर ठेवण्यात आले होते. यानंतर चाहत्यांना प्रतीक्षा होती की अय्यर संघात कधी परतणार? मात्र आता तो दिल्ली येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा भाग असणार हे स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयने याबाबत ट्वीट करत ही माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली आहे.

गेल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या नियमित षटकांच्या मालिकेदरम्यान अय्यरला पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो नागपूर कसोटी सामन्याचा भाग होऊ शकला नाही. त्यामुळे तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रियेत होता.

महत्त्वाचे म्हणजे श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे सूर्यकुमार यादवची प्लेइंग इलेव्हनमधील जागा जाणार आहे. नागपूर कसोटी सामन्यातही कर्णधार रोहित शर्माने श्रेयसच्या अनुपस्थितीत  सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली होता. आणि हा सूर्याचा पदार्पणाचा सामनाही होता. मात्र, पदार्पणातच तो स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला.