पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्यातील मातांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद – जिल्हाधिकारी किशोर तावडे
सिंधुदुर्गनगरी : प्रत्येक मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आजच्या पल्स पोलिओ मोहिमेत देखील जिल्ह्यातील मातांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच आशा स्वयंसहाय्यक उपस्थित होते.
जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील ३४ हजार ९०१ बालकांना पोलिओचा डोस पाजला जाणार आहे. तसेच रविवारी जिल्ह्यातील ९०७ लसीकरण केंद्रावर ही मोहीम राबविली जात आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालय सिंधूनगरी येथे पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन एका बाळाला पोलिओ डोस पाजून झाले.
डॉ. सई धुरी यांनी पल्स पोलिओ बाबत यावेळी विस्तृत माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध माध्यमाद्वारे आरोग्य विषयक जनजागृती केल्या जात आहे. येथील नागरिकही शासनाच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी असतात. ही एक सकारात्मक बाब आहे. पल्स पोलिओ उपक्रमातही जिल्ह्यातील मातांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. सन २०२२ मध्ये पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर आज ३ मार्च रोजी ही मोहीम संपन्न होत आहे. या मोहिमेत आरोग्य विभागाची ९०९ पथके कार्यरत आहेत.
जिल्ह्यात २ लाख ५ हजार २४ एवढ्या घराला भेट देऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते पाच या वेळात हे लसीकरण होत आहे. एसटी स्टँड, रेल्वे स्थानके, यात्रा ठिकाणी, विमानतळ, टोलनाके, मजूर वस्त्या इत्यादी ठिकाणी ४० मोबाईल पथके कार्यरत आहेत असे हे डॉ. सई धुरी यांनी सांगितले.