कोकणाला समृद्ध करण्यासाठी मी कटिबद्ध आहे – रवींद्र चव्हाण


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला. इथल्या पर्यटनक्षेत्राची भरभराट झाली आणि तरूणांना रोजगार उपलब्ध झाला. आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजेत. शेतीला पूरक उद्योग उभारायला हवेत. इथल्या तरुणांना रोजगारासाठी पुणे-मुंबईला धाव घ्यावी लागते, हे स्थलांतर थांबायला हवं. यासाठी मोदीजींच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. कोकणाला समृद्ध करण्यासाठी आपल्या सरकारच्या माध्यमातून, पालकमंत्री म्हणून कटिबद्ध आहे. त्याबाबत येणाऱ्या काळात योग्य ते निर्णय घेतले जातील. अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी कणकवली पर्यटन महोत्सवामध्ये उपस्थितांना दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकूणच कोकणाला लोकसंस्कृतीचा वारसा लाभला आहे. तो वारसा कोकणातील प्रत्येकानं जपण्याचा प्रयत्न केलाय. सिंधुदुर्गवासीयांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी दरवर्षी कणकवली पर्यटन महोत्सवासारखे स्तुत्य उपक्रम आयोजित केले जात आहेत. या उपक्रमांद्वारे कोकणची संस्कृती अनुभवण्याचा आनंद आपल्याला मिळतो. हा महोत्सव आयोजित करणाऱ्या समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी कोरोना काळात कोकणवासीयांची सेवा करणाऱ्या कोरोनायोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

या महोत्सवात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्ष समीर नलावडे यांसोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.