Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये भीषण रस्ता अपघात, 27 जणांचा मृत्यू
Mexico Bus Accident: मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका राज्यात बुधवारी (5 जुलै) प्रवाशांनी भरलेली बस डोंगराच्या रस्त्यावरून घसरली आणि दरीत कोसळली. या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला, तर 21 जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. या अपघातात बसचा पूर्णत: चक्काचूर झाला. घटनास्थळी मदतीसाठी बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.
ओक्साकाचे राज्य अभियोक्ता बर्नार्डो रॉड्रिग्ज अलामिल्ला यांनी एएफपीला दूरध्वनीवरून सांगितले की प्राथमिक आकडेवारीनुसार, 27 लोक ठार झाले आणि 17 जखमींना वैद्यकीय मदतीसाठी परिसरातील विविध रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला असून तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असे सांगण्यात येत आहे.
माहिती देताना नागरिक सुरक्षा एजन्सीने सांगितले की, त्यांनी जखमींना रुग्णालयात नेले तेव्हा किमान सहा जण बेशुद्ध पडले होते आणि त्यांची प्रकृती गंभीर होती. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक वाहतूक कंपनीने चालवलेली बस मंगळवारी (4 जुलै) रात्री राजधानी मेक्सिको सिटी येथून निघाली होती आणि सॅंटियागो डी योसुंडुआ शहराकडे जात होती.
राज्य अधिकारी जीसस रोमेरो यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुर्दैवाने बस 25 मीटर (80 फूट) पेक्षा जास्त खोल दरीत कोसळली. ते म्हणाले की बस चालवणारी कंपनी दररोज मेक्सिको सिटी येथून धावते.
बसचा वरचा अर्धा भाग नष्ट झाला
जीसस रोमेरो यांनी सांगितले की, जखमी प्रवाशांना परिसरातील विविध रुग्णालयात हलविण्यात आले, मृतांचे मृतदेह आपत्कालीन सेवांनी बाहेर काढले. डोंगराळ भागात असलेल्या मॅग्डालेना पेनास्को या गावात हा अपघात झाला. दुर्गम समुदाय, वळणदार रस्ते आणि खडी खोरे आहेत.
ओक्साका राज्याचे गव्हर्नर सॉलोमन जारा यांनी, मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करताना, सोशल मीडियावर लिहिले की मॅग्डालेना पेनास्को येथे झालेल्या अपघाताबद्दल आम्हाला मनापासून खेद वाटतो. आमचे सरकारी कर्मचारी आधीच बचाव कार्य करत आहेत आणि जखमींना सर्व मदत करत आहेत. पोलिसांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये बसचा वरचा अर्धा भाग जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.