क्रिकेटर प्रवीण कुमारच्या कारचा भीषण अपघात


माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारच्या कारला मंगळवारी रात्री मेरठमध्ये अपघात झाला, ज्यामध्ये तो थोडक्यात बचावला. प्रवीण कुमार बागपत रोडवरील मुलतान नगरमध्ये राहत असून रात्री दहाच्या सुमारास तो पांडव नगरकडे जात असताना आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ एका कॅंटरने त्याच्या कारला धडक दिली. या अपघातात माजी क्रिकेटपटू प्रवीणच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारचा अपघात झाला तेव्हा त्याच्यासोबत कारमध्ये त्याचा मुलगाही उपस्थित होता. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. लोकांनी कॅंटर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कॅंटर चालकाला ताब्यात घेतले.

अपघातानंतर जमाव वेगाने जमा झाला आणि त्यांनी आरोपी चालकालाच पकडले. माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसपी सिटी पीयूष कुमार यांनी सांगितले की, कॅंटर चालकाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. सीओने सांगितले की, प्रवीण आणि त्यांचा मुलगा अपघातात सुखरूप आहेत.

प्रवीण कुमारचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2007 मध्येही मेरठमध्ये घरी परतत असताना तो उघड्या जीपमधून पडला होता. 36 वर्षीय प्रवीण कुमारने तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 6 कसोटी सामन्यात 27 बळी, 68 एकदिवसीय सामन्यात 77 बळी आणि 10 टी-20 सामन्यात 8 बळी घेतले आहेत. प्रवीणने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2012 मध्ये खेळला होता. तो आयपीएलमधील अनेक संघांचा भागही आहे.