पावसाळी हंगामात उद्भवणाऱ्या रोगांबाबत खबरदारी घेवून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे: सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ.महेश खलिपे
सिंधुदुर्गनगरी : पावसाळी हंगामात लेप्टोस्पायरोसीस, अतिसार, मलेरीया, डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण आढळून येतात. सदर रोगाच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणेव्दारे आवश्यक त्या उपाययोजना सुरु आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील जनतेने घ्यावयाची खबरदारी म्हणून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ.महेश खलिपे यांनी केले आहे.
आपल्या घरात अगर शेजारी तीव्र ताप, अंगदुखी, थंडी वाजणे, तीव्र स्नायुवेदना, लघवी पिवळी होणे, अशा लक्षणांचा रुग्ण असल्यास अशा रुग्णास त्वरीत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, तसेच जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेण्यास प्रवृत्त करावे. बऱ्याचवेळा रुग्णांची लक्षणे ही किरकोळ स्वरुपाची व नसमजून येणारी असतात, त्यामुळे किरकोळ ताप असल्यास अंगावर तोलू नये उपचारासाठी त्वरित प्रा.आ.केंद्रात दाखल व्हावे. रोगाबाबत घ्यावयाची खबरदारी :- ज्या व्यक्तीच्या हाता पायांवर जखम किंवा खरचटलेले असल्यास अशा व्यक्तींनी दूषित पाणी, दूषित माती तसेच साचलेले पाणी यांच्याशी संपर्क टाळावा.
दूषित पाणी अगर माती यांच्याशी संपर्क टाळणे नसल्यास रबरी बुट हातमौजे वापरावे. जनावरांच्या मलमूत्राशी सरळ संपर्क टाळावा. भात शेतीच्या हंगामात काम करणाऱ्या व्यक्तींनी अंगावर जखम असल्यास जखमेला ब्रँन्डेज करावे. शेतात भात कापणी करणाऱ्या व्यक्तींनी शक्य असल्यास हातमोजे व रबरी बूट वापरावे. पाळीव प्राणी, मांजर, कुत्रा यांच्याशी जवळीकता टाळावी. घरातील व घराशेजारील परिसर स्वच्छ राखावा.
ब्लिचिंग पावडरने निर्जंतुक केलेले किंवा उकळून शुध्द केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. उंदीर,घुशी यांचा नायनाट करावा. सर्व ताप रुग्णांनी त्यांना देण्यात येणारा औषधोपचार नियमित व वेळेवर (डॉक्टरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे) सेवन करावा. नियमित ताजे व गरम अन्न खावे. शौचाहून आल्यावर व जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे. या रोगांचे निदान रक्त व लघवी याची तपासणी करून करता येते. जिल्ह्यात संशयीत तापाच्या रुग्णांच्या रक्ताची व लघवीची तपासणी करुन निदान करण्याची सोय सर्व उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे उपलब्ध आहे.
प्रा. आ. केंद्रामध्ये इपिडेमीक किट (25 रुग्णांसाठी ) तर उपकेंद्रामध्ये (5 रुग्णांसाठी) उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पूरग्रस्त गावामधील व संपर्क तुटणाऱ्या गावामधील गर्भवती महिलांना त्यांच्या EDD नुसार 4 ते 5 दिवस अगोदर दवाखान्यात दाखल करुन घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व जनतेने याबाबत सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे श्री खलिपे यांनी आवाहन केले आहे.