मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमधून आणणार विदेशी गुंतवणूक!
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जात असून, ते जागतिक आर्थिक मंचाच्या व्यासपीठावर परदेशी गुंतवणूकदारांना संबोधित करणार आहेत. तेथे ते १ लाख ४० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतील, असे मानले जात आहे. तसेच महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार आणि उद्योग प्रमुखांशी संवाद साधणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दावोसला जाणार होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे ते जाणार नाहीयत. आता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांसोबत जाणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे रविवारी १५ जानेवारी रोजी मुंबईहून झुरिचला रवाना होतील. सोमवार, १६ जानेवारी रोजी ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन करतील, जिथे ते विविध क्षेत्रातील नामवंत उद्योगांशी सामंजस्य करारही करतील.
सेंटर फॉर न्यू इकॉनॉमी अँड सोसायटी अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे प्रमुखही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मंगळवार, १७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री लक्झेंबर्गचे पंतप्रधान, जॉर्डनचे पंतप्रधान, सिंगापूरचे माहिती व दूरसंचार मंत्री, बँक ऑफ जपान, सौदी अरेबियाचे उद्योग व खाण मंत्री आणि स्विस इंडिया चेंबर यांची भेट घेणार आहेत. त्याच दिवशी शहरांच्या विकासासाठी बदलते पर्यावरण आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची आव्हाने यावर मुख्यमंत्री बोलणार आहेत. स्नेहभोजचेही आयोजन करण्यात आले असून, यामध्ये उद्योग, राजकारणासह विविध क्षेत्रातील १०० ते १५० व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात केंद्रीय मंत्रीही सहभागी होणार आहेत.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही एक खाजगी संस्था आहे, ज्याची स्थापना १९७१मध्ये झाली. संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जिनिव्हा येथे आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून ओळखली जाते. जागतिक क्षेत्रीय आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी जागतिक व्यवसाय, राजकारण, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणणे हे त्याचे ध्येय आहे. फक्त निमंत्रित लोकच यात सहभागी होऊ शकतात. यंदाच्या परिषदेत सुमारे २,५०० लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या शेवटच्या दोन बैठका ऑनलाइन झाल्या.