पालघरमध्ये कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू


पालघर : पालघर जिल्ह्यात रविवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नवजात बालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व मृत व्यक्ती हे एकाच कुटुंबातील आहेत. पालघरमधील चारोटीजवळील श्री महालक्ष्मी मंदिराजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील राठोड कुटुंब रविवारी दुपारी गुजरातच्या दिशेने जात होते. डहाणू श्री महालक्ष्मी मंदिरासमोरील कार चालक दीपक राठोड याने कंटेनर ट्रकला मागून धडक दिली. यामुळे हा अपघात झाला. या अपघातात नरोत्तम छना राठोड (वय ६५), केतन नरोत्तम राठोर (वय ३२), आर्वी दिपेश राठोर (वय ०१) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात चार जण जखमी

या अपघातात दिपेश नरोत्तम राठोड (वय ३५), तेजल दिपेश राठोड (वय ३२), मधु नरोत्तम राठोड (वय ५८), स्नेहल दिपेश राठोड (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर पोलिसांचे प्रवक्ते सचिन नावडकर म्हणाले की, जखमींचे जबाब अद्याप घेतलेले नाहीत, त्यामुळे पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.

सिंधुदुर्ग वार्ताचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा