कर्णधार पॅट कमिन्सने दिला संघाला मोठा धक्का, अचानक ऑस्ट्रेलियाला रवाना


भारतीय संघाकडून सलग दोन कसोटी सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. एकापाठोपाठ एक संकटे संघावर तुटून पडत आहेत. नागपूर आणि दिल्ली कसोटी सामन्यातील पराभवानंतर संघाला मोठा धक्का बसला आहे. अडचणीच्या काळात कर्णधार पॅट कमिन्सने संघ सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार आपल्या देशात रवाना झाल्याचे वृत्त आहे. तो ऑस्ट्रेलियाला का केला यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.

भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी कांगारू संघाचा पराभव केला आहे. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात संघ शानदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. मात्र यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघाला मोठा धक्का बसला आहे.

‘या’ कारणामुळे पॅट कमिन्सला मायदेशी परतावे लागले

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. कौटुंबिक आजारपणामुळे ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट कर्णधाराला काही काळ मायदेशी परतावे लागले आहे. न्यूजकॉर्पच्या रिपोर्टचा हवाला देत फॉक्स क्रिकेटने लिहिले आहे की, २९ वर्षीय कमिन्स २ दिवसांसाठी सिडनीला येणार आहेत. मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी तो संघात सामील होईल.

बॉर्डर गावस्कर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामने झाले असून या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. नागपुरात झालेल्या सामन्यात पाहुण्या संघाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव झाला, तर दिल्लीत यजमान संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात कांगारूंचा संघ ज्या प्रकारे गडगडला, त्यावरून पॅट कमिन्सच्या संघाला मालिकेत पुनरागमन करणे सोपे जाणार नसल्याचे सिद्ध झाले आहे.

पॅट कमिन्सची निराशाजनक कामगिरी

जिथे ऑस्ट्रेलिया संघाला एकामागोमाग पराभवाला सामोरे जावे लागले आहे, तिथे या मालिकेत आतापर्यंत खुद्द कर्णधार पॅट कमिन्सची कामगिरी काही विशेष ठरलेली नाही. पहिल्या दोन सामन्यांत निराशाजनक कामगिरी करून तो संघाच्या पराभवाचे कारण ठरला आहे. त्याने ३९.६६ च्या सरासरीने केवळ तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्यांना यश मिळवणे फार कठीण वाटते. तिसऱ्या कसोटीतही त्याने अशीच कामगिरी करत राहिल्यास मालिकेत संघाचे पुनरागमन कठीण होईल. त्याचवेळी पॅट या सामन्यापूर्वी इंदूरला परतला नाही तर त्याच्या जागी उपकर्णधार आणि वरिष्ठ खेळाडू स्टीव्ह स्मिथ कर्णधारपद भूषवू शकतो.

ऑस्ट्रेलियन संघाचे बहुतांश खेळाडू दुखापतीने त्रस्त

भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे बहुतांश खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. डेव्हिड वॉर्नर दुखापत झाल्यामुळे दिल्ली कसोटीतून बाहेर पडला. त्याचवेळी मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि कॅमेरून ग्रीन हे दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटीत खेळू शकले नाहीत. आता पॅट कमिन्सही ऑस्ट्रेलियात परतला आहे. कर्णधार असण्यासोबतच कमिन्स हा ऑस्ट्रेलियन संघाच्या वेगवान गोलंदाजीचा मुख्य आधार आहे. आता त्याच्या मायदेशी परतल्याने ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत सापडला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून ४९ कसोटी सामन्यात २१७ विकेट्स, ७५ एकदिवसीय सामन्यात १२४ बळी आणि ५० टी-२० सामन्यात ५५ बळी घेतले आहेत.

सध्याच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया संघ सलग दोन सामने हरला आहे. भारतीय फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज टिकाव धरू शकलेले नाहीत. नवी दिल्लीतील दुसरी कसोटी जिंकून भारताने चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली. भारताने गेल्या तीन वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. सध्याच्या मालिकेत टीम इंडियाने पुढचे दोन सामने गमावले तरी ट्रॉफी भारताकडेच राहील.

भारतीय फिरकीपटूंची आश्चर्यकारक कामगिरी 

रवींद्र जडेजाने भारतासाठी दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली. दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यात त्याने 10 बळी घेतले. त्याचवेळी रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी चांगली कामगिरी केली आहे. चेंडूसह चमकदार कामगिरी करण्याबरोबरच, फिरकीपटूंच्या त्रिकुटाने क्रमवारीत उतरूनही चमकदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे शेवटच्या २ कसोटी सामन्यात भारतीय संघ कशा पद्धतीने खेळतो हे पहावे लागेल.