Automatic Weather Station: शिरशिंगेत बसवण्यात आले स्वयंचलित हवामान केंद्र


स्वयंचलित हवामान केंद्र आपल्या शिरशिंगे येथे अखेर बसवण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून विमा धारक शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले ते भविष्यात आता होणार नाही. सदरचे हवामान केंद्र बसवण्यासाठी शिरशिंगे गावचे सरपंच दीपक राऊळ साहेब तसेच माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ साहेब, प्रशांत देसाई व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी खूप सहकार्य केले. तसेच तालुका कृषी अधिकारी मा. श्री गोरखनाथ गोरे यांचेही यावेळी महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.

राज्यात नागपूर, वाशिम, गडचिरोली, पालघर, सिंधुदुर्ग, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रांत स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली आहेत. पुरेशी जागा (पाच बाय सात मीटर), जवळपास मोठा जलाशय, उच्च दाब वीजवाहिनी, मोठी झाडे अथवा इमारत असू नये, हे लक्षात घेऊन स्वयंचलित हवामान केंद्राच्या जागेची निवड केली जाते. या केंद्रांत सेन्सरच्या मदतीने पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, जमिनीतील ओलावा इत्यादी विविध घटकांची माहिती सातत्याने मिळते. ही माहिती पेन ड्राइव्हमध्ये साठवता येते, त्या आधारे अचूक विश्लेषण करता येते. सौर ऊर्जेवर चालणारी बॅटरी जोडली असल्याने विजेबाबत कोणताही अडथळा येत नाही.