रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजुरी


मुंबई: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा रसिकांसाठी माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल सोयीचे ठरणार आहे. रायगड परिसराचा वेगाने होत असलेला विकास आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. त्याच्या उभारणीचे काम दर्जेदार असावे आणि जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात रायगड जिल्ह्याच्या माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-1) असीमकुमार गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-2) के. गोविंदराज, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष शर्मा, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते. तर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नगररचना संचालक अविनाश पाटील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यांसाठी माणगाव हे मध्यवर्ती आहे. या चार जिल्ह्यातील युवा खेळाडूंना आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरेल. या विभागीय क्रीडा संकुलासाठी 40 ते 50 एकर जागा आवश्यक असून ती जिल्हा प्रशासनाने तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. क्रीडा संकुलापर्यंत जाणारा मार्गही प्रशस्त असला पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

माणगाव विभागीय क्रीडा संकुलासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही महामार्गालगत असल्याने कोकणातील चारही जिल्ह्यातील तसेच राज्याच्या अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या खेळाडूंसाठी हे ठिकाण सोयीचे आहे. या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या विभागीय क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करताना आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. नवी मुंबईतील स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या उभारणीचे प्रलंबित कामही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले.