‘त्या’ शिक्षकांची नेमणूक फक्त एका महिन्यासाठीच, दीपक केसरकरांची माहिती


सावंतवाडी : विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांना सामावून घेण्यासाठी काढलेला अध्यादेश केवळ 1 महिन्यासाठी आहे. आता उच्च न्यायालयाचा निर्णय सरकारच्या बाजूने आल्याने लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी जलसमाधी आंदोलनासारखा टोकाचा पवित्रा घेऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

सावंतवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री केसरकर म्हणाले की, संबंधित मागण्या करणाऱ्या उमेदवारांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण न केल्याने हा प्रश्न रेंगाळत आहे. त्यामुळे भविष्यात काही बदल करून सकारात्मक भूमिका घेता येईल का, याचाही विचार सुरू आहे. राज्यात 50 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 30 हजार पदांची भरती होणार असल्याने शिक्षक नसल्याचा विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न सुटणार आहे. दुसरीकडे या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांवर टीका होत आहे. मात्र, ही नियुक्ती एका महिन्यासाठी आहे. त्या ठिकाणी नवीन उमेदवारांना नियुक्ती द्यायची असेल, तर त्यांची निवड, प्रशिक्षण आदी प्रक्रियेला बराच वेळ लागणार असल्याने आम्ही निवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही केसरकर म्हणाले. ( Appointment of retired teachers for one month only School Education Minister Deepak Kesarkar informed )