तिलारी घाटात पुन्हा अपघात, टँकर खोल दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला


दोडामार्ग : अत्यंत अवघड घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिलारी घाटात अवजड वाहनांच्या अपघाताचे प्रमाण कायम असून गुरुवारीही तिलारी घाट उतरत असताना ऑईल टँकरचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने, संरक्षक भिंतीला धडकल्याने टँकर खोल दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. जोपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण होत नाही तोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाटात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

दरम्यान, अवघड वळणावर हा टँकर अडकल्याने प्रवासी एसटी बस वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातात टँकरच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून, वाहतूकही विस्कळीत झाल्याने याचा विपरीत परिणाम वाहतुकीवर झाला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.

गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पेट्रोलने भरलेला टँकर तिलारी घाटमार्गे गोव्याकडे जात होता. घाटातील जयकर पॉइंट येथील तीक्ष्ण वळणाजवळ येताच चालकाला तीव्र उताराचा अंदाज न आल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि ती थेट रेलिंगवर आदळली. सुदैवाने टँकर खोल दरीत पडण्यापासून बचावला. मात्र या अपघातामुळे रस्ता ठप्प होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती.

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळची वेळ असल्याने बेळगावहून पणजीकडे जाणारी वस्तीची एसटी बस आणि कोल्हापूरहून दोडामार्गकडे येणारी दोन एसटी घाट रस्त्यावरच अडकली आहेत. याशिवाय दोडामार्ग ते बेळगाव आणि पणजी ते कोल्हापूर अशी एसटीसुध्दा रस्ता बंद झाल्यामुळे अडकून पडली. त्यामुळे प्रवासी वर्ग त्रस्त झाला आहे. हे अपघात सातत्याने घडत असल्याने बांधकाम विभागाने ठोस उपाययोजना आखण्याची मागणी होत आहे. ( accident at Tilari ghat sindhudurg news )