LPG Price; महागाईचा भडका! गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढले


LPG Price: साधारणपणे तेल विपणन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती सुधारतात. 1 जुलै 2023 रोजी यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता, मात्र तीन दिवसांनंतर आज मंगळवारी कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत (LPG Gas Cylinder) वाढ करून मोठा धक्का दिला आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार, कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 7 रुपयांनी वाढल्या आहेत. यानंतर, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची दिल्ली किरकोळ विक्री किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

गेल्या सलग दोन महिन्यांपासून कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून दिलासा दिला होता. 1 जून 2023 रोजी सिलिंडर 83.5 रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता, तर यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत 172 रुपयांनी कमी करण्यात आली होती. तथापि, घरगुती स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या 14 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

तेल विपणन कंपन्यांनी केलेल्या ताज्या वाढीनंतर आता दिल्ली व्यतिरिक्त कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1875.50 रुपयांवरून 1882.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. याशिवाय मुंबईत त्याची किंमत 1725  रुपयांवरून 1732 रुपये करण्यात आली आहे. जर आपण चेन्नईबद्दल बोललो, तर येथे जो व्यावसायिक सिलिंडर 1937 रुपयांना मिळत होता, तो आता 1944 रुपयांना मिळणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर

एकीकडे गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात आणि वाढ होत आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरचे दर गेल्या वर्षभरापासून स्थिर आहेत. ताज्या सुधारणांमध्येही, तेल विपणन कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. देशातील चारही महानगरांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही.

राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांना उपलब्ध आहे, तर कोलकात्यात तुम्ही 1129 रुपयांना खरेदी करू शकता. त्याची किंमत मुंबईत 1102.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.50 रुपये आहे.