‘वंदे भारत एक्स्प्रेस’चं कणकवली रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत


कणकवली : अत्याधुनिक ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस आता मडगाव ते मुंबई या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. या ट्रेनला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळहून व्ही.सी. द्वारे हिरवा झेंडा दाखवला.  दुपारी एक वाजता ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस कणकवली रेल्वे स्थानकावर येताच भाजप कार्यकर्त्यांनी आणि प्रवाशांनी जल्लोषात स्वागत केले. या एक्स्प्रेसमधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रवास केला.

कणकवली रेल्वे स्थानकावर ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधुगर्जना ढोल पथकाने ढोल-ताशांच्या गजरात ‘वंदे भारत’ स्वागत केलं. तर कणकवली बांधकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी कोकण रेल्वेच्या इतिहासावर आधारित पथनाट्य सादर केले.

भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष तथा भजनी बुवा संतोष कांदे यांनी वंदे भारत एक्स्प्रेसचे स्वागत करणारी गीते व पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विकासकामांचे वर्णन करणारी गाणी सादर केली. त्यांना भजनी बुवा प्रकाश पारकर, संतोष मिराशी चव्हाण, मिलिंद मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर, सुशील सावंत आदींनी पाठिंबा दिला.


वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत करण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती. वंदे भारत एक्स्प्रेसचे छायाचित्र मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्याच्या प्रयत्नात युवक व्यस्त होते. या वेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, कोकण रेल्वेचे प्रादेशिक वरिष्ठ अभियंता रवींद्र पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्या तेरसेंसह भाजप कार्यकर्ते व रेल्वे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोडींची अचूक आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सिंधुदुर्ग वार्ता’ न्यूज वेबसाईटच्या Whatsapp ला Join व्हा 👇

https://chat.whatsapp.com/EhO0BsRA3psDTfgRfYIwro