‘वंदे भारत’ एक्सप्रेसमुळे कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होईल – मंत्री रविंद्र चव्हाण


पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भोपाळ रेल्वे स्थानकावरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून ५ ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा शुभारंभ केला. भोपाळ ते इंदूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदींनी स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला, तर देशातील इतर चार मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशला एकाच वेळी दोन वंदे भारत ट्रेन भेट दिल्या आहेत. राणी कमलापती रेल्वे स्थानक ते जबलपूर दरम्यान वंदे भारत ट्रेन धावेल. दुसरीकडे, दुसरा वंदे भारत खजुराहो ते इंदूरला भोपाळमार्गे जोडेल. यासह गोवा, बिहार आणि झारखंडलाही आता पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. राणी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस, खजुराहो-भोपाळ-इंदूर वंदे भारत एक्सप्रेस, मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, धारवाड-बंगलोर वंदे भारत एक्सप्रेस आणि हातिया-पटना वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी भोपाळच्या राणी कमलापती स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला.

रविंद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया 

देशाच्या विकासाला चालना देणारी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस मोदी सरकारने देशाला अर्पण केली. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ही आलिशान हायस्पीड ट्रेन सर्व सुविधांनी उपयुक्त आहे. मुंबई – मडगाव धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमुळे आम्हा कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होईल. त्याचप्रमाणे गोवा व कोकणातील पर्यटनाच्या विकासाला अधिक जलद गती मिळेल. असं मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत.