सिंधुदुर्गात राजकीय दहशतवाद आणि गुंडगिरीचा विळखा वाढत आहे : विनायक राऊत


कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा हा विचारवंत आणि संस्कृतीचा संरक्षक आहे. सिंधुदुर्गातील जनतेने नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू या विचारवंतांना खासदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र, अलीकडच्या काळात जिल्ह्यात राजकीय दहशतवाद आणि गुंडगिरीचा विळखा फोफावत आहे. या विकृती ज्ञानी आणि परोपकारी श्रीधर नाईक यांचा जीव घेतला. त्यामुळे ही विकृती नष्ट करण्यासाठी सिंधुदुर्गातील जनतेने एकत्र यावे, असे आवाहन खासदार विनायक राऊत vinayak raut यांनी केले.

श्रीधर नाईक यांच्या 32 व्या स्मृतीदिनानिमित्त कणकवली नरडवे तिठा येथे नाईक परिवार व श्रीधर प्रेमींच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम, रक्तदान शिबिर, बचतगटातील महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार विनायक राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, शिवसेना उपनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे अरुण दुधवडकर, कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, डॉ. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, नीलम सावंत-पालव, मुरलीधर नाईक, युवासेनेचे जिल्हाप्रमुख व श्रीधर नाईक यांचे पुत्र सुशांत नाईक, संकेत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले, श्रीधर नाईक यांचा समाजसेवेचा वारसा त्यांचे पुत्र सुशांत नाईक, संकेत नाईक, पुतणे आमदार वैभव नाईक हे समर्थपणे पुढे चालवत आहेत. सामाजिक उपक्रमातून श्रीधर नाईक यांच्या स्मृती जपण्याचे काम नाईक परिवार करत आहे. सुशांत नाईक युवा सेनेसाठी काम करत असून त्यांना चांगले राजकीय भवितव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीधर नाईक यांच्या कार्याचा वारसा लाभल्यानेच मी आमदार होऊ शकलो, असे मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले. पक्षासाठी प्राणाची आहुती देऊन कार्यकर्ता पक्ष वाढीसाठी काम करतो. मात्र, पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा नसल्याची खंत व्यक्त करतानाच श्रीधर नाईक यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील राक्षसी शक्तीचा नायनाट करण्यासाठी श्रीधर नाईक प्रेमींनी एकत्र येण्याचे आवाहन सुधीर सावंत यांनी केले.