IPL इतिहासातील 10 सर्वात महागडे खेळाडू
आयपीएल २०२३च्या लिलावामध्ये इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन आतापर्यंतचा सर्वात महागड्या बोलीवर खरेदी केलेला खेळाडू ठरला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला आयपीएल लिलावात १८.५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी होती. सॅम कॅरेन हा असा परदेशी खेळाडू आहे, ज्याच्यावर या वेळी त्याला मोठी किंमत मिळू शकते, अशी अटकळ आधीपासूनच होती. गेल्या मोसमात कॅरेन चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता, पण यावेळी पंजाबने त्याला हिसकावून घेतले.
या लिलावात इंग्लिश खेळाडूंवर पैशांचा वर्षाव करण्यात आला आहे. बेन स्टोक्स देखील असाच एक खेळाडू होता, ज्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याला चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने १६.२५ कोटींना विकत घेतले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरून ग्रीन हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला मुंबई इंडियन्सने १७.५० कोटींना विकत घेतले आहे. आम्ही अशा १० खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे आतापर्यंत IPL मधील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.
IPL इतिहासातील १० सर्वात महागडे खेळाडू
१. सॅम करन
या यादीत इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन अव्वल स्थानावर आहे. विशेष म्हणजे त्याने आयपीएलमध्ये पदार्पण पंजाब किंग्जकडूनच केले. २०१९ मध्ये संघाने त्याला ७.२ कोटींना खरेदी केले. यानंतर तो २०२० आणि २०२१ मध्ये CSK कडून खेळला. पाठीच्या दुखापतीतून सावरल्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये आयपीएल मेगा लिलावासाठी त्याने नोंदणी केली नाही. करनने ख्रिस मॉरिस, युवराज सिंग, ख्रिस मॉरिस आणि पॅट कमिन्स या खेळाडूंचे विक्रम मोडीत काढले आहेत.
२. कॅमेरॉन ग्रीन
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने १७.५० कोटींना विकत घेतले आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ग्रीनने एप्रिल 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० पदार्पण केले आहे.
३. बेन स्टोक्स
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसशी बरोबरी साधली असून त्याला CSK ने यावेळी १६.२५ कोटींना विकत घेतले आहे. यंदाच्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडच्या विजयात स्टोक्सची महत्त्वाची भूमिका होती, त्यामुळे त्याचे नाव लिलावाच्या यादीत खूप वरचे होते. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. आरसीबी आणि राजस्थानने त्याच्यावर बोली लावली, लखनौ आणि हैदराबादनेही बोली लावली, पण चेन्नईने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले.
४. ख्रिस मॉरिस
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस २०२१ मध्ये १६-२५ कोटींमध्ये विकला गेला तोपर्यंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होता. त्याने युवराज सिंगचा विक्रम मोडला. २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला सर्वाधिक बोली लावून विकत घेतले. त्याच्या एक वर्ष आधी, बंगळुरूने त्याला १० कोटींना विकत घेतले, पण पुढच्या लिलावापूर्वी त्याला फ्रँचायझीमधून सोडले. २०२१ च्या लिलावात त्याला त्याच्या ७५ लाखांच्या मूळ किमतीपेक्षा २१ पट जास्त मिळाले. मात्र, मॉरिसने या वर्षी जानेवारीमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
५. निकोलस पूरन
वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन याला लखनौ सुपरजायंट्सने लिलावात १६ कोटींना विकत घेतले आहे. तो आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा यष्टीरक्षक फलंदाज आहे. पुरन २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळला, जेव्हा त्याला मेगा लिलावात १०.५ कोटींमध्ये विकत घेतले गेले. त्याने १४ सामन्यात ३०६ धावा केल्या.
६. युवराज सिंग
युवराज सिंग हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय आयपीएल खेळाडू आहे. माजी भारतीय क्रिकेट अष्टपैलू युवराज सिंगला २०१५ IPL मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) ने १६ कोटींना विकत घेतले होते. त्याच्या शेवटच्या हंगामात आरसीबीने त्याला १४ कोटींना खरेदी केले होते. १४ सामने खेळून त्याला २४८ धावा आणि फक्त एक विकेट मिळवता आली. नंतर दिल्लीने त्याला सोडले, त्यानंतर हैदराबादने त्याला ७ कोटींना विकत घेतले होते.
७. पॅट कमिन्स
ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स आता या यादीत सातव्या क्रमांकावर आला आहे. २०२० च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला १५.५ कोटींना विकत घेतले. कमिन्सने त्या मोसमात १२ विकेट घेतल्या होत्या. टीमने त्याला २०२२ च्या लिलावासाठी सोडले, पण नंतर त्याला ७.२५ कोटींना विकत घेतले. मात्र, यावेळच्या लिलावापूर्वी कमिन्सने हिपच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
८. इशान किशन
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन हा IPL २०२२ च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. किशनला पहिल्यांदा मुंबईने 2018 मध्ये विकत घेतले होते. 2022 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने कोणत्याही खेळाडूवर 10 कोटींहून अधिक बोली लावण्याची ही पहिलीच वेळ होती.
९. काइल जेमिसन
२०२१च्या लिलावात न्यूझीलंडचा काइल जेमिसन हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू होता. आरसीबीने त्याला १५ कोटींना खरेदी केले. तथापि, या किवी खेळाडूने २०२२च्या हंगामातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
१०. दीपक चहर
दीपक चहर हा आयपीएलमधील सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला आहे. २०२२ च्या लिलावासाठी त्याला CSK ने १४ कोटींना विकत घेतले होते. २०१६ मध्ये त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्समधून पदार्पण केले.