सावंतवाडी: चराठा-स्वप्ननगरीमध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी, भाविक दत्ताच्या चरणी झाले लिन


सावंतवाडी : विद्युतरोषणाई आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी चराठा येथील स्वप्ननगरीमध्ये श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दत्तगुरूंच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दत्त जयंती निमित्ताने भाविकांना प्रसादाचाही लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वप्ननगरीमध्ये श्री दत्त जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले होते. अभिषेक, महापूजा, आरती, आदी कार्यक्रम पार पडले.

या महोत्सवाने भाविकांना आध्यात्मिक अनुभूती दिली असून, या निमित्ताने स्वप्ननगरीमधील उत्सवाची परंपरा अधिक सशक्त झाली आहे. या मंगल प्रसंगी मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने गजबजलेला दिसत होता. दत्तगुरूंच्या जयघोषांनी आणि भक्तीगीतांच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.यंदाच्या दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सूर्योदयापासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली.

श्रीदत्तात्रेय म्हणजे कोण? श्री. दत्तात्रेय हे अत्री ऋषी आणि अनसूया यांचे पुत्र होय. मंदिरांमध्ये श्री दतात्रेयाची मूर्ती तीन मुखांची दाखविलेली असते. तसा दत्तात्रेय कधीच नव्हता. दत्तात्रेयकल्पानुसार दत्ताचा रंग गोरा असून तो एकमुख आणि चतुर्भुज आहे. त्याचा एक हात व्याख्यान मुद्रेत , एक गुढग्यावर ठेवलेला , दोन हातांत कमळे आणि नेत्र अर्धोन्मीलित आहेत. आजचे त्रिमुखी, षड्भुज दत्तस्वरूप प्राचीन ग्रंथात आढळत नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेशत्मक त्रिमूर्तींची लोकप्रियता वाढल्यानंतर इ. सन १००० च्या सुमारास किंवा त्यानंतर दत्तात्रेयाला त्रिमुखी स्वरूप देण्यात आले. दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठायी ब्रह्मा-विष्णू-महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असे मानले जाऊ लागले.

ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली. विष्णू संवर्धन, पालन करतो आणि भगवान शंकर तिच्यातील वाईट गोष्टींचा लय करतो अशी श्रद्धा आहे.दत्तात्रेय हा विष्णूच्या चौवीस अवतारांपैकी सहावा अवतार मानला जातो. काही संशोधकांच्या मते हा चौथा किंवा सातवा अवतार आहे. तप करणाऱ्या कार्तवीर्य अर्जुनाला दत्तात्रेयाने सप्तद्वीपांकित पृथ्वीचे राज्य , सहस्र बाहू आणि युद्धात अत्रेयत्त्व दिले असे अग्निपुराणात सांगितले आहे.

सचिन आमुणेकर