मुंबईतील ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट
मुंबई: ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आज येथे दिली.
पॉल मर्फी यांनी गुरुवारी (दि. २१) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत असल्याची माहिती पॉल मर्फी यांनी दिली.
भारतीय विद्यापीठांसोबत पदवी अभ्यासक्रमात सहकार्य, विद्यार्थी आदानप्रदान, परस्पर देशांमधील पदव्यांना मान्यता, ‘कमवा, शिका आणि पर्यटन करा’ आदी योजनांबद्दल विचार विनिमय सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी राज्यपालांना दिली.
पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी ब्रिस्बेन व पर्थ ही शहरे देखील मुंबईशी थेट विमानसेवा सुरु करण्याबाबत विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
क्रिकेट उभय देशांना जोडणारा दुवा : राज्यपाल
क्रिकेट हा भारत व ऑस्ट्रेलियाला जोडणारा सशक्त दुवा असून मर्फी यांच्या न्यू साऊथ वेल्स राज्याने क्रिकेट विश्वाला डॉन ब्रॅडमन, अॅलन बॉर्डर, मार्क टेलर, स्टीव्ह वॉ यांसारखे महान खेळाडू दिले आहेत असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. भारतातील तीन लाखांच्यावर पर्यटकांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला भेट दिल्याचे सांगून आपल्या कार्यकाळात उभय देशांमधील पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले.
नव्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यात येत असून ऑस्ट्रेलियाने भारतीय विद्यापीठांशी सहकार्य वाढवावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
बैठकीला ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील उपवाणिज्य दूत क्रिश्चन जॅक व आर्थिक राजनीतिक अधिकारी गरिमा शेवकानी उपस्थित होते.