टीम इंडियात विराटची जागा घेणार ‘हा’ खेळाडू ?
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघासाठी अनेक पराक्रम केले आहेत. २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या किंग कोहलीने आपल्या दमदार कामगिरीमुळे चाहत्यांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र आता वाढत्या वयाबरोबर त्याचा संघातून पत्ता कट होताना दिसत आहे. अशा स्थितीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली त्याची जागा घेण्यासाठी खेळाडू तयार झाला आहे. या खेळाडूने गेल्या काही काळात आपल्या खेळाच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. चला तर मग जाणून घेऊया त्या खेळाडूबद्दल जो कोहलीची जागा घेऊ शकतो.
श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत भारतीय निवड समितीने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. यापैकी एक नाव होते राहुल त्रिपाठी. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याची संघात निवड झाली. त्यानंतर हार्दिक पांड्याने त्याला पदार्पणाची संधी दिली. या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्याने सर्वांना प्रभावित केले. या मालिकेतील त्याची कामगिरी पाहूनच तो विराट कोहलीच्या जागी संघात स्थान मिळवू शकतो, असे बोलले जात आहे. भविष्यात किंग कोहलीची जागा क्वचितच कोणी घेऊ शकेल, पण राहुल आपल्या संघाची उणीव भासू देणार नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या दोन्ही खेळाडूंची फलंदाजीची शैली. खरेतर विराट त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि राहुल त्रिपाठीनेही श्रीलंकेविरुद्ध आपली आक्रमक फलंदाजी दाखवून दिली.
दुसरं कारण म्हणजे विराट कोहलीप्रमाणे राहुलही गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे विरोधी संघाचे गोलंदाज आत्मविश्वास गमावून चुका करतात आणि राहुल त्याचा फायदा घेतो. श्रीलंकेविरुद्ध या ३१ वर्षीय फलंदाजाने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व राखले आणि धावा केल्या.
View this post on Instagram
तिसरे कारण म्हणजे फलंदाजीचा क्रम. राहुल देखील विराटप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ओळखला जातो. राहुलला टी-२० मालिकेत मोठी धावसंख्या उभारता आली नसली, तरी त्याने आपल्या दमदार खेळीने संघाच्या धावसंख्येमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. राहुल त्रिपाठीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३३.२६ च्या सरासरीने आणि ७ शतकांच्या मदतीने २७२८ धावा केल्या आहेत, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या १७८२ धावा आहेत. त्याचबरोबर त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये धावा केल्या आहेत. त्याची आयपीएलमधील कामगिरीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने ७४ डावात १७९८ धावा जोडल्या आहेत.
अलीकडेच टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर दोन सामने खेळल्यानंतर त्याच्या खात्यात ४० धावा जमा झाल्या आहेत. राहुलच्या या आकडेवारीनंतर आता विराट कोहली टीम इंडियातून बाहेर पडू शकतो. कारण भारतीय निवड समिती २०२४ च्या विश्वचषकासाठी युवा संघ तयार करण्याचा विचार करत आहेत. अशा स्थितीत राहुल विराटचा सर्वोत्तम रिप्लेसमेंट बनू शकतो.