डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता राखून डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. नागरिकांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
मंत्री दीपक केसरकर यांनी ‘शासन आपल्या दारी‘ कार्यक्रमाअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई वॉर्ड क्षेत्रातील ‘जनतेशी सुसंवाद‘ साधून समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्यांबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य नाही तेथे प्रत्यक्ष भेट देऊन एका आठवड्यात समस्या सोडवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी आमदार यामिनी जाधव, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे, सहायक आयुक्त अजयकुमार यादव यांच्यासह सर्व संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, विभागातील रहिवाशांच्या अनधिकृत पार्किंग, कमी दाबाने पाणी येणे, कचरा स्वच्छ करणे, राशन दुकानावरून धान्य न मिळणे आदी सर्वसाधारण समस्या आहेत. या समस्या सोडविणे ही राज्य शासन, महानगरपालिका, पोलीस विभाग आदी यंत्रणांची जबाबदारी असते. संबंधित विभागांनी रहिवाशांच्या लहान लहान तक्रारींची दखल घेऊन त्या तातडीने सोडविणे गरजेचे आहे. ड्रेनेजची नियमित सफाई करावी. शाळांच्या इमारती तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी फवारणी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. नागरिकांपर्यंत धान्य पोहोचविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १९ वाहने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घेऊन आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना दीपक केसरकर यांनी केली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच झाले पाहिजे याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ड्रग्स मुक्त मुंबई करणे हे शासनाचे धोरण असून अशा घटना आढळून आल्यास पोलिसांनी त्या तातडीने बंद कराव्यात. ज्या विकासकांनी रहिवाशांची पर्यायी व्यवस्था केली नसेल अथवा पुनर्विकासाची कामे थांबवली असतील त्यांना महापालिकेने नोटीस द्यावी. ज्यांचे जन्म दाखले अद्याप दिलेले नसतील त्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरात विशेष मोहीम राबवून ते दाखले द्यावेत, अशी सूचना मंत्री दीपक केसरकर यांनी केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
उपस्थित नागरिकांसह आमदार यामिनी जाधव यांनी यावेळी परिसरातील रहिवाशांच्या समस्या मांडल्या. गावदेवी मंदिरास ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.