कोकणातील चाकरमान्यांसाठी गुड न्यूज! एसटी महामंडळ ३१०० जादा बसेस सोडणार


मुंबई : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्या फुल्ल असतात, अशातच एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना खुशखबर दिली आहे. गणपतीत कोकणात जाणाऱ्यांसाठी जादा 3,100 एसटी बसेस धावणार आहेत. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान 3,100 जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटीचं एक अतुट नातं आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेत एसटी धावत असते, यातच यंदा एसटी महामंडळाने चाकरमान्यांना गोड बातमी दिली आहे. यंदा सुमारे 3,100 जादा एसटी गाड्या कोकणातील रस्त्यावर धावणार आहेत.14 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

कसं कराल एसटी बसचं आरक्षण? : एसटी बस आरक्षणासाठी तुम्हाला https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या संकेतस्थळावरुन तुम्हाला उपलब्ध बसची माहिती मिळेल. एसटी बसेसचं आरक्षण तुम्हाला बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या Msrtc Mobile Reservation App ॲपद्वारे करता येणार आहे. त्याचप्रमाणे खासगी बुकींग एजंट देखील तुम्हाला एसटी बस आरक्षित करुन देऊ शकतात.