slender lorises सिंधुदुर्गात वन्यप्रेमींना आढळून आला ‘वनमानव’, वाचा सविस्तर
स्लेंडर लोरीस 'वनमानव' हा अत्यंत दुर्मिळ प्राणी सिंधुदुर्गात आढळून आला आहे
सिंधुदुर्ग : पर्यटन जिल्हा असलेल्या तळकोकणातील सिंधुदुर्गात स्लेंडर लोरीस हा अत्यंत दुर्मिळ प्राणी वन्यप्रेमींना आढळून आला आहे. रात्रीच्या वेळी हा प्राणी हुबेहूब माणसासारखा दिसत असल्यामुळे त्याला वनमानव म्हटलं जातं. सिंधुदुर्गात आंबोली, केसरी, फणसवडे, तळकट, झोळंबे या गावांच्या आसपासच्या जंगलात आणि तिलारीच्या घनदाट जंगलात काही जणांना आत्तापर्यंत हा प्राणी दिसला असल्याची माहिती आहे.
हा प्राणी माकडाच्या प्रजातीतलाच एक अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. अशीया खंडातील श्रीलंका आणि भारत या २ देशात याचं मूळ असल्याचे पुरावे आहेत. वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार या प्राण्याचा ‘शेड्यूल वन ‘ म्हणजे अधिसूची क्रमांक एकमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र स्लेंडर लोरीस या प्राण्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीची शक्यता असल्यामुळे याचं अचूक स्थान अत्यंत गुप्त ठेवलं गेलं आहे. स्लेंडर लोरिस अर्थात वनमानव जंगलात आढळणे म्हणजे हे जंगल अद्यापही जैवविविधतेने अत्यंत समृद्ध असल्याचं उदाहरण आहे.
स्लेंडर लोरिस हा माकडाच्या प्रजातीतलाच एक अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचा प्रत्येक अवयव हा अत्यंत औषधी असल्याचा प्राणी तस्करांचा समज असल्याने आणि जादूटोणा, करणी, जारण मारण यासाठी तांत्रिक मांत्रिकांकडून या प्राण्याला मोठी मागणी असल्याने या प्राण्याच्या तस्करीची शक्यता जास्त आहे. त्यामुळे स्लेंडर लोरिसला आंतरराष्ट्रीय तस्करीचा धोका आहे. तामिळनाडूत अशाच प्रकारे या प्राण्याची तस्करी आणि शिकार झाल्यामुळे झपाट्याने याची प्रजाती कमी झाली आहे. म्हणून या प्राण्याचं सरंक्षण करण्यासाठी यां प्राण्यांच्या स्थानाविषयी अत्यंत गुप्तता पाळण्यात येते. ( slender lorises loris found in sindhudurg sindhudurg news )