तळकोकणातील दोडामार्गमधील तिलारीत आढळले दुर्मिळ प्रजातीचे ‘तारा कासव’


सिंधुदुर्ग : तळकोकणातील दोडामार्गमधील तिलारी येथील पाताडेश्वर मंदिराजवळ सुभाष लक्ष्मण दळवी यांना भारतीय स्टार कासवाची Indian Star Tortoise  अत्यंत दुर्मिळ प्रजाती सापडले. त्यांनी ते कासव येथील वनविभागाच्या ताब्यात दिले. भारत आणि श्रीलंकेच्या काही प्रदेशात हे कासव आढळून येतात. इंडियन स्टार कासवे ही वन्यजीव संरक्षण अधिनयानुसार संरक्षित असून त्यांची खरेदी विक्री करण्यास बंदी आहे.

पाळये येथील शेतकरी सुभाष लक्ष्मण दळवी हे सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोडामार्गकडे जात होते. दरम्यान, दोडामार्ग-विजघर महामार्गावरील तिलारी येथील पाताडेश्वर मंदिराजवळ ते आले असता त्यांना हे अत्यंत दुर्मिळ प्रकारचे कासव दिसले. त्यांनी ते कासव वनविभागाच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे या कासावाच्या पृष्ठभागावर तारे आणि कुबड्यासारखे फुगीर भाग असतात. त्यामुळे हा कासव इतर कासवांपेक्षा विशेष आहे

हे कासव इंडियन स्टार कासव म्हणून ओळखले जाते. गेल्या वर्षीही याच प्रजातीचे कासव याच परिसरात आढळून आले होते. या ‘तारा’ कासवाचे वजन 800 ग्रॅम, लांबी 17 सेमी, रुंदी 10 सेमी, घेर 25 सेमी असल्याचे समोर आले आहे. ( Indian Star Tortoise found in tilari sindhudurg )