भारताच्या राष्ट्रपती 25 ते 27 जुलै दरम्यान ओदिशाच्या दौऱ्यावर
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 ते 27 जुलै 2023 या कालावधीत ओदिशाचा दौरा करणार आहेत. 25 जुलै 2023 रोजी संध्याकाळी, राष्ट्रपती ‘अतुट बंधन’ परिवाराने प्रायोजित केलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या गटाशी संवाद साधतील तसेच भुवनेश्वर येथे ओदिशाच्या राजभवनाच्या नवीन इमारतीची पायाभरणी करतील.
26 जुलै 2023 रोजी, कटक येथे ओरिसा उच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिन समारंभात राष्ट्रपती सहभागी होतील. याच दिवशी त्या कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वार्षिक समारंभाला संबोधित करतील तसेच कटक येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठ ओदिशाच्या दीक्षांत समारंभालाही संबोधित करतील.
27 जुलै 2023 रोजी, राष्ट्रपती राजभवन ओदिशा येथे असुरक्षित आदिवासी गटाच्या (PVTGs) सदस्यांशी संवाद साधतील. याच दिवशी त्या प्रजापिता ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या “सकारात्मक बदलाचे वर्ष” या देशव्यापी परिसंवाद आणि परिषदा आयोजित करण्याच्या उपक्रमाची या वर्षीची मुख्य संकल्पना प्रकाशित करतील. तसेच दासबाटिया, तामांडो, भुवनेश्वर येथे “लाईटहाऊस कॉम्प्लेक्स” ची पायाभरणी करतील.