इरशाळगड येथे बचाव कार्यास प्राधान्य देत युद्धपातळीवर मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळावर


मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इरशाळवाडी येथील वस्तीवर काल रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या Irshalgad Landslide.  यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार महेश थोरवे, आमदार महेश बालदी, विभागीय आयुक्त महेश कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे  उपस्थित होते.

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचावकार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. एनडीआरएफच्या  टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील एमआयडीसीमधील कामगार एनडीआरएफच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरशाळवाडी येथे मदत व बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर ग्रामस्थांना भेटून आस्थेने विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये तर जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाईल, असे जाहीर केले. तसेच, शासनाकडून सर्व मदत करण्याचे आश्वासित केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून चौकशी, मदतीची ग्वाही

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दूरध्वनीवरून माहिती घेतली. त्यांनी बचाव कार्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे, हे प्राधान्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली

“इरशाळगड दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता मदतकार्य गतीने होत आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत व बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत”, असे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतली माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहचून दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचे संनियंत्रण केले.

जखमींची मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून रुग्णालयात विचारपूस

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील जखमींची संख्या वाढल्यास प्रशासनाने सज्ज असावे, अशा सूचना संबंधित रूग्णालयाला दिल्यात. यावेळी एमजीएमचे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी  नायब तहसीलदार पनवेल श्री. लाचके उपस्थित होते.

शिवभोजन थाळी पॅकेटचे मोफत वितरण, अत्यावश्यक अन्नधान्यही देणार

शिवभोजन थाळीच्या पॅकेटचे मोफत वितरण दुर्घटनाग्रस्तांना करण्यात येणार आहे. शिवाय पाच लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, इतर शिधा देखील देण्यात येणार आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत पुरवठा सुरूच राहणार आहे.

संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक

चौक दूरक्षेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक काळसेकर  यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्रमांक 8108195554 असा आहे.

नागरिकांना आवाहन

भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. इरशाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी  न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. अति मुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक आणि अतिमहत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

०००