कोकण विभागातील प्रादेशिक पर्यटन परिषदेचे 19 जुलैला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते उद्घाटन


सिंधुदुर्ग : पर्यटन संचालनालयमार्फत कोकणातील प्रादेशिक पर्यटन परिषद दिनांक 19 जुलै 2023 रोजी दुपारी 3.30 ते 6.30 या वेळेत कणकवली येथील स्वामी विवेकानंद हॉल येथे आयोजित केली आहे. या पर्यटन परिषदेला पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी आणि पर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन पाटील ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. तर पर्यटन परिषदचे उद्घाटन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागाचे उपसंचालक (पर्यटन) हनुमंत हेडे यांनी दिली.

त्याअनुषंगाने पर्यटन संचालनालयाने “आपला महाराष्ट्र ” या संकल्पनेवर आधारित “प्रादेशिक पर्यटन परिषदा “नाशिक, पुणे येथे आयोजित केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट व्यवसायिक, जल क्रीडा व्यवसायिक, टूर ऑपरेटर, कृषी पर्यटन, टूर गाईड आणि होम स्टेधारक अशा ८० पर्यटन सहभागीदार यांनी या पर्यटन परिषदेला सहभाग नोंदविला आहे. परिषदेत पर्यटन विभागाच्या विविध योजना यावर सादरीकरण होणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ यांची चर्चासत्र आणि प्रश्न उतारांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कटिबध्द असलेल्या पर्यटन संचालनालयाने महाराष्ट्रातील पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्याच्या तसेच राज्यातील पर्यटन व व्यवसाय सहकार्यांना चालना देण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या अद्वितीय सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक संपत्तीचा लाभ घेण्याचे महाराष्ट्र पर्यटनाचे उद्दिष्ट आहे. वैविध्यपूर्ण आणि रमणीय भूप्रदेश, अद्वितीय शहरे आणि समृद्ध वारसा यासह, महाराष्ट्र हे नियमित पर्यटक आणि नाविन्याचा शोध घेणारे प्रवासी या दोघांसाठी दीर्घकाळापासून पसंतीचे ठिकाण आहे.

मुंबईचे गजबजलेले महानगर, लोणावळा आणि महाबळेश्वर हे आकर्षक हिल स्टेशन्स, प्राचीन अजिंठा आणि एलोरा लेणी, आणि कोकणातील बोर्डी, डहाणू श्रीवर्धन दिवाआगार, अलिबाग, वर्सोली, आंजर्ले, गुहागर, आरे-वारे, देवबाग तारकर्ली, निवती, भोगवे, मीठबांव, इ. समुद्रकिनारे यासारख्या प्रसिध्द ठिकाणे राज्यात आहेत. महाराष्ट्राचे अलौकीक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन करून, पर्यटन विभागाने राज्याला जगभरातील पर्यटकांसाठी एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून स्थान देण्याचा मानस आहे