राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती’ गठित करण्यात आली आहे. या समितीने विविध शिफारशी केल्या असून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शीघ्र कृती समिती आणि ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल. तसेच या ठिकाणी येणाऱ्या उद्योजकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अमरावती येथील ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाईल पार्कचा मुंबईच्या कलिना परिसरातील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश, उच्च व तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार नवनीत राणा कौर, अनिल बोंडे, आमदार रवी राणा, राजन सिंग, राहुल कुल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्र सरकारसाठी विशेष दिवस आहे. कोविड कालावधीनंतर राज्यात आज घडीला मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रो, आरे कारशेड, बुलेट ट्रेन, शिवडी-न्हावाशेवा एमटीएचएल पूल, कोस्टल रोड यासारखी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ, जमीन, पाणी, ऊर्जा, दळणवळणाच्या सुविधा निर्माण होत आहेत. राज्याला पुढे नेण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्व करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना विभागाच्या वतीने चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. देशाचे पाच ट्रिलियन डॉलर इकोनॉमीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर उद्दिष्ट साध्य करण्याचे काम करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
डाओसमध्ये अनेक देशाच्या प्रतिनिधींना महाराष्ट्रातील गुंतवणीसाठी गुतवणूक संधिची माहिती दिली असून अनेक उद्योगांनी राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सकता दाखवली आहे. यावेळी 1 लाख 37 हजार कोटी रुपयांचे करार झाले असून यापैकी 86 हजार कोटींचे कामे सुरू आहेत.
राज्यामध्ये 75 हजार सरकारी नोकर भरतीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गामुळे अनेक सुविधा निर्माण होत आहेत. या कनेक्टिव्हिटीमुळे इंधन व वेळेची बचत होणार आहे. त्याचबरोबर मुंबईत देखील बदल घडत असताना दिसत आहेत खड्डे मुक्त मुंबई, मुंबईच्या सौंदर्यकीकरणावर भर व स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे.