संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रपतींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2023 रोजी अबूधाबी येथे संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) राष्ट्रपती आणि अबु धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची शिष्टमंडळ स्तरावर भेट घेतली आणि चर्चा केली.

यावेळी या दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय भागीदारीच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, फिनटेक, ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, हवामान बदलासंबंधी उपाय, उच्च शिक्षण आणि परस्पर संबंध अशा विविध मुद्द्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. यावेळी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली.

दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत पुढीलप्रमाणे तीन महत्त्वपूर्ण करार करण्यात आले.

दोन्ही देशांदरम्यान परस्पर व्यवहारांसाठी स्थानिक चलनांचा (INR – AED) वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठीच्या फ्रेमवर्कच्या स्थापनेसाठी भारतीय रिझर्व बॅंक (RBI) आणि संयुक्त अरब अमिराती मधील (UAE) सेंट्रल बँक यांच्यात सामंजस्य करार

भारतीय रिझर्व बॅंक (RBI) आणि संयुक्त अरब अमिराती मधील (UAE) सेंट्रल बँक यांच्यात, परस्परांच्या पेमेंट आणि मेसेजिंग सिस्टमला एकमेकांशी जोडण्यासाठी द्विपक्षीय सहकार्यासाठीचा सामंजस्य करार

भारताचे शिक्षण मंत्रालय, अबुधाबीचा शिक्षण आणि ज्ञान विभाग, आणि आयआयटी दिल्ली यांच्यात, यूएईमध्ये अबू धाबी येथे आयआयटी दिल्ली संकुल स्थापन करण्याच्या नियोजनासाठी सामंजस्य करार

या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. तसेच हवामान बदलाबाबत स्वतंत्र संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले.