विजेचा शॉक लागून 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
पुण्यातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जत्रेत जाण्यासाठी मुले इच्छुक असतात. त्यामुळे पालक आपल्या मुलांना आनंद द्विगुणित करण्यासाठी परिसरातील जत्रेत घेऊन जातात. मात्र पुण्यातील जत्रेत पालकांवर सुखाऐवजी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. येथे आकाश पाळण्यात बसताना एका 9 वर्षाच्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात ही घटना घडली आहे.
कात्रज कोंढवा रस्त्यावर फॉरेन सिटी एक्झिबिशन नावाने पुण्यात फनफेअर भरवण्यात आलीय. त्यावेळी आकाश पाळण्यात बसताना गणेश पवार या 9 वर्षांच्या मुलाचा लोखंडी जाळीला स्पर्श झाला. त्या जाळीमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्यामुळे गणेश शॉक लागून जमिनीवर कोसळला. त्याला बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं.
दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी संयोजक, तसेच विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड यांच्याकडून तपास सुरू आहे.