जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनाच्या यादीत महाराष्ट्रातील 8 सागरी किल्ले


सिंधुदुर्ग : महाराष्ट्र किल्ले संवर्धन समितीने नुकतेच राज्यातील आठ सागरी किल्ले युनेस्को UNESCO (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी नामांकन पाठवण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये वसई, जंजिरा, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, यशवंतगड या बाणकोट, अर्नाळा आणि कुलाबा या किल्ल्यांचा समावेश आहे.

नामांकन प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. हा दुसरा प्रस्ताव असून यापूर्वी पाठवलेल्या पहिल्या प्रस्तावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १४ किल्ल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील केवळ जागतिक वारसा स्थळ नामांकित वास्तूंच्या देखरेखीसाठी एक प्राधिकरण नियुक्त करण्याची सरकारची योजना आहे.

महाराष्ट्र किल्ले संवर्धन समितीतील एक वरिष्ठ सदस्य म्हणाले की, हे सागरी किल्ले १७ व्या शतकातील आणि त्यापूर्वीच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे प्रस्तावित केले जात आहेत. कोकण किनारपट्टी ही गनिमी युद्धाच्या रणनीतीची मांडणी होती.
मध्ययुगीन काळात, सागरी व्यापारात गुंतलेले अरब, तुर्क आणि युरोपीय लोक प्रथम कोकणात दिसू लागले. कोकण किनार्‍यावरील सर्व किल्ले इतर देशांसह विविध संस्कृतींच्या एकत्रीकरणाचे केंद्र म्हणून काम करतात.

कोकणात अशा प्रकारे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पाऊलखुणा आहे जे युनेस्कोला आकर्षित करू शकतात. पुढे बोलताना ते म्हणाले की. डेक्कन कॉलेजचे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि त्याच समितीचे सदस्य सचिन जोशी यांनी या आठ किल्ल्यांना मोठे ऐतिहासिक महत्त्व असल्याचं सांगितलं आहे. हे किल्ले सागरी व्यापारासाठी आणि शत्रूंना दूर ठेवण्यासाठी वापरले जात होते.

१५ व्या शतकात पोर्तुगीज भारतात आले. भारताचा पश्चिम किनारा हा परदेशी आक्रमणकर्त्यांसाठी अनुकूल प्रवेश द्वार होतं. पोर्तुगीजांनी या प्रदेशात अरबांना आणि त्यांच्या व्यापाराला मागे टाकले आणि तेथे आपल्या वसाहती उभारल्या. जोशी पुढे म्हणाले, १७ व्या शतकात शिवाजी महाराजांनी ठाणे ते सिंधुदुर्गपर्यंत पसरलेल्या खाडीच्या तोंडावर आणि मध्यभागी अनेख किल्ले बांधले. या किल्यांमुळे शिवाजी महाराजांना मोठ्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यास मदत केली.

पश्चिम किनार्‍यावरील बहुतेक किल्ले शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत, तर काही निजाम शाही आणि आदिल शाही राजघराण्यातील आहेत, परंतु नंतर शिवाजी महाराजांनी ते ताब्यात घेतले. राज्य सरकारने यापूर्वी या किल्ल्यांच्या सन्मानासाठी मराठा लष्करी स्थापत्य शैलीतील शिवाजी महाराजांच्या काळातील १४ किल्ल्यांची निवड केली होती.

या वर्षी, केंद्राने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या दर्जासाठी चराइदेव मैदाम (आसाममधील प्राचीन दफनभूमी) भारताचे एकमेव नामांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी १६ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींना यासंदर्भात एक पत्र लिहिले होते.

सध्या भारतात एकूण 40 युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात 32 सांस्कृतिक स्थळे, 07 नैसर्गिक स्थळे आणि 01 मिश्रित स्थळे आहेत. युनेस्को जागतिक वारसा स्थळे ही जगभरातील अशी ठिकाणे आहेत ज्यांना विशेष सांस्कृतिक, ऐतिहासिक किंवा भौतिक महत्त्व आहे. UNESCO ही UN ची एक विशेष संस्था आहे, ज्याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडनमध्ये झाली. त्याचे मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे आहे.