हाजरा मेमोरियल हॉस्पिटलला आग, डॉक्टर दांपत्यासह 6 जणांचा मृत्यू


झारखंडमधील एक रुग्णालय आगीचा गोळा बनले आहे. धनबादमध्ये रात्री उशिरा एका खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत एका डॉक्टर दाम्पत्यासह एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर डॉक्टर कुटुंबासह राहत होते. आधी स्टोअर रूमला आग लागली, त्यानंतर आग पसरतच गेल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. सध्या अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी धनबादमधील आरसी हाजरा मेमोरियल हॉस्पिटलच्या निवासी संकुलात लागलेल्या आगीतील मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. सीएम सोरेन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “धनबादमधील हाजरा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरा लागलेल्या आगीत प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. विकास आणि डॉ. प्रेमा हजरा यांच्यासह एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून हृदय व्यथित झाले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो.

त्याचबरोबर आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी स्थानिक आमदाराने केली आहे. धनबादचे भाजप आमदार राज सिन्हा यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले की, “धनबादसाठी काळी रात्र. धनबादच्या प्रीमियर हॉस्पिटल, हाजरा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत डॉ. प्रेमा हजरा, डॉ. विकास हजरा यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला.” अत्यंत दुःखद घटना आहे.या घटनेची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे. ईश्वर सर्वांच्या आत्म्याला शांती देवो.

धनबादमधील एका खासगी नर्सिंग होममध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ही आग लागली. मृतांमध्ये नर्सिंग होमचे मालक डॉ. विकास हाजरा, त्यांची पत्नी डॉ. प्रेमा हाजरा, मालकाचा पुतण्या सोहन खमारी आणि घरातील नोकर तारा देवी यांचा समावेश आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रांचीपासून सुमारे 170 किमी अंतरावर असलेल्या धनबादच्या बँक मोड भागात असलेल्या नर्सिंग होमच्या स्टोअर रूममध्ये पहाटे 2 वाजता आग लागली.