पावसाचा कहर! कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला


कुडाळ : तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्गात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. नदी, नाले, नाल्यांना पूर आला आहे. मंगळवाली सकाळपासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरू झाला होता. सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचले आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कुडाळ तालुक्यात पडला असून कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे.

कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील ब्रिटीशकालीन पूल पाण्याखाली गेल्याने 27 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच माणगाव खोऱ्यातील दखनवाड पूलही पाण्याखाली गेला आहे. तर कुडाळ ते माणगाव या झाराप-माणगाव रस्त्यावरील साळगाव येथील पूलही पाण्याखाली गेला आहे.

कुडाळ शहरात सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरू होता. सायंकाळी ७ नंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. कुडाळ शहरातील गुलमोहोर हॉटेलच्या मागे असलेल्या कलाप नाक्याजवळील भंगसाळ नदीला पूर आला असून येथील जुन्या पुलाच्या काठावर पाणी साचले आहे. कुडाळ शहरात आज 5 ते 6 तास मुसळधार पाऊस झाला. कोणतीही हानी झाली नाही.